संपूर्ण अंदमान, निकोबार बेटे व्यापली ; दक्षिण श्रीलंकेतही मॉन्सून दाखल

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शुक्रवारी (ता. २१) अंदमान बेटांवर दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी मुसंडी मारली आहे. मॉन्सूनने संपुर्ण अंदमान, निकोबार बेटसमुह व्यापला असून, श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरही मॉन्सून दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

बंगालच्या उपसागरात आज (ता. २२) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याचे सोमवार (ता. २४) चक्रीवादळात रुपांतर होऊन ही प्रणाली बुधवारपर्यंत (ता. २६) ओडिशा, पश्चिम बंगाल, बांग्लादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याचे संकेत आहेत. या वादळामुळे बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचे प्रवाह बळकट होऊन मॉन्सूनचा वेगाने प्रवास सुरू झाला आहे.

नैर्ऋत्येकडून येणारे वारे, ढगांची झालेली दाटी, पावसाची हजेरी यामुळे शुक्रवारी (ता. २१) बंगालच्या उपसागरात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपुर्ण अंदमान निकोबार बेटसमुह व्यापून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मजल मारली आहे. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील काही भागात मॉन्सून दाखल हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे.

नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची वाटचाल दर्शवते (सौजन्य : हवामान विभाग)

दरम्यान, यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचे आगमनात चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीच्या वर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *