मॉन्सून उद्या अंदमानात दाखल होणार

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाची चाहूल लागली असून, अदमान बेटांजवळ ढगांची दाटी होत आहे. उद्या (ता. २१) मॉन्सून अंदमान बेटांवर दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. अरबी समुद्रातील “ताऊते” चक्रीवादळापाठोपाठ आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. हे वादळ मॉन्सूनची गती वाढण्यास पोषक ठरणार आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. या भागात विषूववृत्ताकडून वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत असून, ढगांची रेलचेल पहावयास मिळत आहे. उद्या (ता.२१) मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल होणार आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार अंदमान निकोबार बेटांवर साधारणतः १८ ते २० मेपर्यंत मॉन्सून दाखल होतो असतो.

शनिवारपर्यंत (ता. २२) बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार आहे. सोमवारपर्यंत (२४) त्याचे चक्रीवादळ तयार होणार असून, उत्तरेकडे सरकत असताना, त्याची तीव्रता वाढणार आहे. बुधवारपर्यंत (ता.२६) ही वादळी प्रणाली पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचे आगमनात चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीच्या वर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *