मॉन्सून कालावधीत ९८ टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी (ता. १६) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. गतवर्षी प्रमाणे यंदा सर्वसाधारण पावसाच्या पूर्वानुमानामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र पहावयास मिळणार आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने मॉन्सून पावसासाठी पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९६१ ते २०१० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८८ सेंटिमीटर म्हणजेच ८८० मिलिमीटर आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४० टक्के), तर दुष्काळाची शक्यता १४ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीपेक्षा १०९ टक्के (अधिक ९ टक्के) पाऊस पडला होता.

मॉन्सूनच्या पावसाची शक्‍यता

पावसाचे प्रमाणशक्‍यता
९० टक्‍क्‍यांहून कमी१४ टक्के
९० ते ९६ टक्के२५ टक्के
९६ ते १०४ टक्के४० टक्के
१०४ ते ११० टक्के१६ टक्के
११० टक्‍क्‍यांहून अधिक५ टक्के

महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज

मॉन्सूनच्या दीर्घकालीन अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने राज्यनिहाय पडणाऱ्या संभाव्य पावसाची स्थिती दर्शविणारा नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार यंदा महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यासह, दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उर्वरीत राज्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे.

सौजन्य : हवामान विभाग

एल-निनो सर्वसामान्य राहणार

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रात गतवर्षाच्या अखेरच्या टप्प्यात ला – निना स्थिती निर्माण झाली होती. नोव्हेंबर महिन्यात ती सर्वोच्च स्थितीवर पोचली होती. मात्र २०२१ च्या सुरवातीला ला-निना स्थिती निवळण्यास सुरूवात झाली आहे. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत जाणार आहे. मात्र मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडल्सनुसार मॉन्सून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात महासागराचे तापमान (एल-निनो स्थिती) सर्वसामान्य राहण्याचे संकेत आहेत. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी – इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसामान्य आहे. मॉन्सून हंगामातही हीच स्थिती नकारात्मक पातळीकडे झुकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दृष्टिक्षेपात मॉन्सून अंदाज

मॉन्सूनच्या हंगामातील (जून ते सप्टेंबर) कालावधीसाठी हवामान विभागाने दिलेले अंदाज आणि प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची स्थिती (आकडे टक्क्यांमध्ये)

वर्षअंदाजपडलेला पाऊस
२०१६१०६९७
२०१७९६९५
२०१८९७९१
२०१९९६११०
२०२०१००१०९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *