मुंबई : महाराष्ट्र राज्यातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचविण्याच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील लहान व मध्यम वृत्तपत्रे टिकून रहावीत, त्यांना बातम्या व महत्त्वाच्या घडामोडी वेळेवर उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र वृत्त सेवा (महावृत्त) या संस्थेच्या स्थापनेला १४ एप्रिल रोजी ३० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या व्यवस्थापनाचे राज्यभरातील पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील नामवंतांकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले.

थोर कायदे तज्ज्ञ, जागतिक कीर्तीचे विचारवंत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून १४ एप्रिल १९९१ रोजी महाराष्ट्र वृत्त सेवा (महावृत्त) या संस्थेच्या कामकाजाचा प्रारंभ करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि नामवंत शिक्षणतज्ज्ञ प्रा.(कै) राम जोशी यांचे मार्गदर्शन लाभलेल्या या वृत्तसंस्थेच्या मुख्यसंपादक पदाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार व मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री. कुमार कदम यांनी स्वीकारली.

ज्येष्ठ पत्रकार व दै. नवशक्तीचे मुख्य वार्ताहर कै. चंद्रकांत भोगटे, दै, मुंबई सकाळचे माजी संपादक कै. आत्माराम सावंत, राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे माजी संचालक स्व. रमेशचंद्र वाबगावकर (मुंबई), अर्थतज्ज्ञ स्व. माधवराव रानडे (मुंबई), लोकसत्ताचे माजी मुख्य वार्ताहर स्व. वसंत शिंदे तसेच सर्वश्री ज्येष्ठ पत्रकार शांताराम जोशी (औरंगाबाद), रामभाऊ जोशी (पुणे), सकाळचे माजी संपादक श्री. राधाकृष्ण नार्वेकर, आदी वृत्तपत्र साहित्य निर्मितीच्या क्षेत्रातील कर्तबगार मंडळींनी या वृत्तसंस्थेला प्रारंभी आकार दिला.

भारत गजेंद्रगडकर उस्मानाबाद, श्रीमती सुवर्णा नार्वेकर आदींचा या संस्थेत सक्रीय सहभाग राहिला. नंतरच्या काळात शिवाजी धुरी यांनी संस्थेसाठी मोठे योगदान दिले. परिणामी, राज्यातील छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रांना बातम्यांबरोबरच सामाजिक प्रश्न, सार्वजनिक आरोग्य, वृक्ष संवर्धन, जल व्यवस्थापन, शालेय शिक्षण, कृषी, फलोद्यान, विज्ञान आदि विविध विकासात्मक विषयांवर दर्जेदार साहित्य पुरविले गेले आणि संस्था स्थापन करण्यामागील उद्देश सफल झाला. आजही संस्थेने आपले हे ‘मिशन’ पुढे सुरू ठेवले आहे.

आजच्या सारखे आत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही राज्याच्या ग्रामीण भागातील छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रांना बातम्या पुरविणारी महावृत्त ही पहिली वृत्तसंस्था आहे. मुंबई, पुणे यासारख्या महानगरांतील मोठ्या वृत्तपत्रांच्या तुलनेत मनुष्यबळ, साधन सामुग्री आणि इतर यंत्रणा कमी असणाऱ्या ७० हून अधिक ग्रामीण वर्तमानपत्रांना संस्कारीत बातम्या, विविध विषयांवरील लेख पुरविण्याचे काम महावृत्तच्या माध्यमातून करण्यात आले. सुरूवातीला ही सेवा दूरध्वनी, टपाल तसेच कुरियर सेवा या माध्यमातून दिली जात असे. मात्र ही सेवा अधिक जलद गतीने आणि प्रभावीपणे वृत्तपत्रांकडे पोहोचविण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे ‘ई-मेल’द्वारा ही सेवा देण्यात आली. त्याशिवाय लेख आणि बातम्यांप्रमाणेच महत्त्वाचे क्षण टिपणारी छायाचित्रेही पाठविली जात असत.

‘महाराष्ट्र वृत्त सेवे’चे आणखी एक वैशिष्टय म्हणजे ही सेवा प्रत्येक वृत्तपत्राला त्याच्याकडील संगणकामध्ये बसविण्यात आलेल्या भाषेच्या ‘सॉप्टवेअर’मधील ‘फॉन्ट’मध्ये उपलब्ध होत असे. उदा. एखाद्या वृत्तपत्राकडे ‘श्रीलिपी’ असेल तर ‘महाराष्ट्र वृत्त सेवे’कडून ‘ई-मेल’द्वारा पाठविला जाणारा सर्व मजकूर सदर वृत्तपत्राला ‘श्रीलिपी’मध्येच मिळत असे व तो थेट ‘डाऊनलोड’ करता येत असे; तो पुन्हा टाईप करावा लागत नसे. त्यात संबंधित वृत्तपत्राचा वेळ, मराठी टंकलेखनासाठी होणारा खर्च आणि मेहनत वाचत असे. हा सर्व मजकूर संपादकीयदृष्टया पूर्णपणे संस्कारीत म्हणजे ‘एटीट’ केलेला असे.

मराठी बातम्याचे संकेतस्थळ सुरू करण्याचा पहिला मानही ‘महावृत्त’ या संस्थेला मिळाला, संस्थेने ‘महावृत्त डॉट कॉम‘, च्या माध्यमातून वीस वर्षापूर्वी आधुनिक संगणक युगात पदार्पण केले, सध्या संकेतस्थळाच्या संपादनाची जबाबदारी श्री. अमोल कुटे हे सांभाळत आहेत, अशी माहिती महावृत्त संस्थेचे मुख्य संपादक कुमार कदम यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *