अतिदुर्गम चांदर गावात पुण्यातील युवकांचा उपक्रम

पुणे : वेल्हे तालूक्यातील अतिदुर्गम चांदर गावाच्या ‘टाके वस्ती’ या वाडीत पिण्याचे पाणी थेट अंगणापर्यंत पोचवून अबाल वृद्धांची तहान भागविण्याचे काम पुण्यातील युवकांनी नुकतेच पुर्णत्वास नेले. यावेळी या गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याबरोबरच, ग्रामस्थांना अन्नधान्य व पाण्याच्या हांड्यांचे वाटपही करण्यात आले.

दुर्गम भागातील ग्रामस्थांच्या मदतीसाठी नंदकुमार जाधव मित्र परिवाराच्या पुढाकाराने सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चांदर गावात वीज आल्यापासून वेगाने सुविधा उपलब्ध होत आहेत. या गावातील टाकेवस्ती येथे लोकसहभागातून पाण्याची टाकी व पाईप लाईनचे काम यापुर्वीच झाले होते. मात्र टाकीपर्यंत पाणी पोचविण्यासाठी वीज पंपाची सोय नव्हती. सहकारनगर लायन्स क्लबचे डॉ. प्रसाद खंडागळे यांनी स्वखर्चातून वीजपंप उपलब्ध करून दिला. हा पंप सार्वजनिक विहीरीवर बसवून टाकीपर्यंत पाणी पोचविण्यात आले. अंगणात पाणी आल्याने महिलांची पायपीट थांबणार आहे.

उपलब्ध झालेले हे पाणी घरापर्यंत वाहून नेण्यासाठी अनिकेत कोंढाळकर यांनी वाढदिवसाचे निमित्ताने महिलांना स्टीलचे हांडे भेट दिले. डॉ. किरण हिंगे यांनी स्वखर्चाने सुमारे शंभर लोकांसाठी आरोग्य शिबीर घेत मोफत औषधे उपलब्ध करून दिली. तसेच टिळक रोडवरील ओंकार मित्र मंडळाच्या वतीने गुलाब निवंगुणे व अक्षय आहेर यांनी अन्न धान्याचे वाटप केले. रविंद्र पठारे, प्रसाद चिकणे, सुरेश मांदळे, अमोल कुटे, किरण राहूरकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *