पालकमंत्री, पणनमंत्र्यांकडे करणार तक्रार

पुणे : मार्केटयार्डातील भुसार विभागात रस्ते, पाणी, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी दि पूना मचर्ंटस् चेंबरतर्फे वेळोवेळी प्रशासकांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र प्रशासक व्यापार्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पालकमंत्री आणि पणनमंत्र्यांकडे संघटनेतर्फे प्रशासकांची तक्रार करणार आहेत.

दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, सहसचिव अनिल लुंकड यावेळी उपस्थित होते.

पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, भुसार विभागातील प्रश्नांबाबत जी पत्रे प्रशासकाला देण्यात आली आहेत. त्या पत्राची यादीही पालकमंत्र्यांना दिली जाणार आहे. तसेच पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून प्रशासकाची लेखी तक्रार करणार आहोत. व्यापार्‍यांचे प्रश्न सुटत नसल्याने बाजार समितीच्या इतिहासात भुसार व्यापार्‍यांना प्रथमच प्रशासकाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली. हा प्रकार गंभीर असल्याचे ओस्तवाल यांनी नमुद केले.

बाजार समितीने स्वच्छतागृह बांधली आहेत. मात्र त्याला वापराविना कुलूप लावून ठेवले आहे. बाहेरून येणार्‍यांसाठी पाणीपोई बांधण्यात आली, मात्र आज अखेरपर्यंत त्याचा वापर सुरू केला नाही. बाजारातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. व्यापार्‍यांना वायफायची सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ही सुविधा कागदावरच आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावले, मात्र अद्याप ते सुरूच करण्यात आले नसल्याचेही पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.

माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले म्हणाले, प्रशासकाकडे व्यापार्‍यांना भेटण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ नाही. सकाळी गेले की ते बैठकीत असतात. दुपारनंतर ते बाजार समितीच्या कार्यालयातच नसतात. काही वेळा तर ते ४ ते ५ दिवस कार्यालयात येतच नाहीत. अशा वेळी व्यापार्‍यांनी दाद कोणाकडे मागायची. त्यामुळे बाजारातील समस्या सोडवायच्या असतील, तर बाजार समितीला पूर्णवेळ प्रशासक असला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *