गावठाण जमाबंदी प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : जिल्ह्यातील गावांच्या गावठाणामधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यासाठी गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी महसूल व भूमि अभिलेख यंत्रणांनी अचूकपणे व जबाबदारीने कामे करावीत. जमाबंदी प्रकल्प ड्रोन सर्व्हे करत असताना सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प यशस्वीपणे राबवावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात गावठाण जमाबंदी प्रकल्पाबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.देशमुख बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक राजेंद्र गोळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, सबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सर्व्हेक्षण विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने गावठाणाचे सर्व्हेक्षण करून मिळकतीचा डिजिटाईज्ड नकाशा तयार करण्यात येणार आहे. मोजणासाठी निवडण्यात आलेल्या गावांचे नियोजन करावे व ड्रोनव्दारे गावठाण मोजणीची प्रक्रिया समन्वयाने पार पाडावी.

जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक राजेंद्र गोळे म्हणाले, महसूल, भूमी अभिलेख व ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प अंतर्गत १ हजार १८४ गावात ड्रोन सर्व्हे करण्यात येणार आहे. पुरंदर, हवेली व दौंड तालुक्यात सर्व्हेक्षणाला सुरूवात झाली असून, या योजनेत सर्व्हेसाठी सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *