मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. महाविद्यालये सुरु करण्यात यावी अशी मागणी विविध क्षेत्रातून होत होती. याबाबत १ फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतीगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) विद्यापीठांनी तयार करावी. अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या होत्या.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ५ नोव्हेंबर रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेची उपलब्धता पाहून, ५० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील प्रतिबंधित प्रक्षेत्रातील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये ही ज्या आयुक्त, महानगरपालिका/नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याअंतर्गत येतात, त्यांच्याशी संबंधित विद्यापीठाने विचारविनिमय करावा.

कोविड-१९ च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन, विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करुन नियमित वर्ग घेण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. संबंधित विद्यापीठांनी स्थानिक प्राधिकरणांची सहमती घेऊन महाविद्यालये सुरु करावीत, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *