शरद पवारांवरील टिकेबाबत अंकुश काकडे यांचे सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर

पुणे : शरद पवार यांनी अनेक क्रीडा संघटनांची राज्य पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अध्यक्ष पदे भूषविली आहेत. ही पदे स्विकाराना संपुर्ण अभ्यास करून, या खेळांना व खेळाडूंना सन्मान मिळवून दिला आहे. एखाद्या क्रिडा संघटनेचं अध्यक्ष होण्यासाठी तो खेळ खेळलाच पाहिजे हे महत्त्वाचे नाही. पवारांचे हे योगदान सदाभाऊ खोत यांना कसे समजेल, कारण शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच असते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रवक्ता अंकुश काकडे यांनी खोत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शेतकरी आंदोलनाबाबतच्या वक्तव्यावरून भारतरत्न सचिन तेडुंलकर यांच्यावर सध्या चौफेर टिका होत आहे. याबाबत ”आपल्याला ज्या क्षेत्राची सखोल माहिती नाही, अभ्यास नाही अशा विषयावर मत प्रदर्शन करु नये”, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी तेंडुलकर यांचे कान टोचले. त्यानंतर भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून पवार यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.

त्याबाबत काकडे यांनी भुमिका मांडली आहे. ते म्हणाले, शरद पवार यांनी सचिन तेंडुलकर यांना दिलेल्या सल्ल्यावर भाजप व त्यांचे मित्र पक्षांना फार झोंबले आहे. पवारांनी कुस्ती, क्रिकेट, कबड्डी, खोखो अशा अनेक संघटनांचे राज्य पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक अध्यक्ष पदे भूषविली आहेत, ती भूषवित असतांना प्रत्यक्ष तो खेळ खेळला नसला तरी त्या खेळाचा संपूर्ण अभ्यास, माहिती घेऊनच ती पदे स्विकारली. ती पदे केवळ शोभे पुरती स्विकारली नाहीत,तर त्या खेळांना प्रोत्साहन देणे, खेळाडुंना सन्मान मिळवून देणं, त्यांची आर्थिक स्थिती भक्कम करणं ह्याकडे जाणीवपूर्णक लक्ष दिले.

कुस्ती आशियाई देशात नेण्यासाठी त्यांचे योगदान त्या क्षेत्रातील मंडळीकडुन जाणून घेतले तर त्यांच्यावर टीका करण्याची वेळ येणार नाही. खोखो असेल, कबड्डी असेल या खेळाच्या प्रगतीसाठी त्या खेळाडुंना सरकारी नोकरी मिळवून देणे, पदोन्नती देणे हे काम कुणी केलं ? आय. पी. एल. मुळे क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन आज ५ आकड्यात गेलं आहे, ते कुणामुळं हे सदाभाऊंनी जरा पाहून घ्यावं.

सचिन तेंडुलकर बद्दल सर्वांनाच अभिमान आहे, त्याचे कर्तुत्व वादातीत आहे. पण त्याचा राजकारणासाठी वापर करुन घेणं कितपत योग्य आहे. याचा टीका करणाऱ्यांनी विचार करायला हवा. आपल्याला ज्या क्षेत्राची सखोल माहिती नाही, अभ्यास नाही अशा विषयावर मत प्रदर्शन करु नये, हा वडीलकीचा सल्ला पवारांनी सचिनला दिला, त्यात वावगे काय आहे? आणि त्यावर सचीनच कांहीच म्हणणं नाही, पण ह्या अंधभक्तांना ते कुठून कळणार, असा चिमटाही काकडे यांनी काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *