कावळे, बगळे, कोंबड्यांचा मृत्यू ; लातूरमध्ये ‘संसर्गग्रस्त’ क्षेत्र घोषित

पुणे : हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये ‘बर्ड फ्लू’ रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष ‘पॉझिटिव्ह’आले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. ठाणे, परभणी, बीड, लातूर या जिल्ह्यांत ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव आढळून आला आहे. लातूर येथील नमुनेही सकारात्मक आल्याने, या क्षेत्रास “संसर्गग्रस्त क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

राज्यात बुधवारपर्यंत (ता.१३ ) लातूर १८, बीड ३, यवतमाळ २९४, नांदेड ९, अहमदनगर ३, पुणे १३, भंडारा ७९, सोलापूर ९ व अकोला जिल्ह्यात १३, अशी ४५५ कुक्कुट पक्षांमध्ये मरतुक झालेली आहे. बीड व नाशिक जिल्ह्यात १ बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये व अहमदनगर जामखेड तालुक्यात १ कबुतराचा अशा एकूण ५ पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात ४, रत्नागिरीत १, सातारा १, अकोला ५, अहमदनगर १, यवतमाळ ५ व पुणे जिल्ह्यात ४ अशा प्रकारे एकूण राज्यात २१ कावळ्यांमध्ये मरतुक आढळून आली आहे.

दरम्यान ८ जानेवारी पासून आजतागायत एकूण २३५९ विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर राज्यात बुधवारी (ता. १३) दिवसभरात एकूण ४५६ पक्षांमध्ये मरतुक झाली आहे. हे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास ४८ ते ७२ तास लागू शकतात.

पुर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथून नुकतेच प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबईतील घोडबंदर (जि.ठाणे) व दापोली या ठिकाणांचे कावळे आणि बगळे तसेच मुरुंबा (ता. जि. परभणी) या ठिकाणचे पोल्ट्री फार्म मधील नमुने हायली पॅथोजेनिक एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच ५ एन १ या स्ट्रेन) करीता आणि बीड येथील नमूने (एच ५ एन ८ या स्ट्रेन) करीता पॉझीटीव्ह आलेले आहेत.

लातूर येथील नमुनेही सकारात्मक आल्यानुसार, या क्षेत्रास “संसर्गग्रस्त क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या निर्बंधांनुसार बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव आढळून आलेल्या पोल्ट्री फार्मपासून १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, मुरुंबा (ता. जि. परभणी) येथील सुमारे ३४४३ व केंद्रेवादी, ता. अहमदपूर वा सुकानी जिल्हा लातूर येथील सुमारे ११०९२ कुक्कुट पक्षी, नष्ट करण्यात आले आहेत. तथापि, मुंबई, घोडबंदर (जि.ठाणे), दापोली व बीड येथे केवळ सर्वेक्षण सुरु ठेवण्यात आले आहे.

राज्यात कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांमध्ये मरतूक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मरतूक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती दयावी. मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अंडी, मांस खाणे पुर्णत: सुरक्षित

अंडी व कुक्कूट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यु रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, असे आवाहनही आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: