लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका; गुलाबी थंडी झाली गायब

पुणे : सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती कीड रोगांसाठी पोषक ठरत आहे. राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे सावट असून, शनिवारपर्यंत (ता. ९) विविध भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबरच्या सुरवातीला दक्षिण समुद्रामध्ये चक्रीवादळांची साखळी होती. एका पाठोपाठ आलेल्या “गती”, “निवार” आणि “बुरेवी” वादळांनी दक्षिण भारतातील राज्यांना तडाखा दिला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात उत्तर भारतातील थंडीने हातपाय पसरायला सुरूवात केल्यानंतर महाराष्ट्रातही गारठा वाढला. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या किमान तापमानात घट होत, थंडीची लाट आली. मात्र, ही गुलाबी थंडी फार काळ टिकली नाही. सध्या ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे.

दरम्यान, पुर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिण-मध्य अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने राज्यात ढगाळ वातावरण होत आहे. दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा देखील होत आहे. शनिवारपर्यंत (ता. ९) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पावसाची शक्यता असलेले जिल्हे : ( सौजन्य : हवामान विभाग )

अवकाळी पावसाची शक्यता अधिक असलेले जिल्हे (सौजन्य : हवामान विभाग)

गुरूवार (ता. ७) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, बीड, लातूर.

शुक्रवार (ता. ८) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ.

शनिवार (ता. ९) :
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *