कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज

पुणे : ढगाळ हवामान होत असल्याने राज्यात दोन तीन दिवसांपासून गारठा काहिसा कमी झाला आहे. यातच अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबरच्या सुरूवातीला दक्षिणेकडील समुद्रामध्ये चक्रीवादळांची साखळी तयार झाली. एका पाठोपाठ आलेल्या “गती”, “निवार” आणि “बुरेवी” चक्रीवादळांनंतर आता अरबी समुद्राच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. तर अफगाणिस्तान आणि परिसरावर असलेल्या पश्चिमी चक्रावातमुळे हिमालयाच्या पायथ्यालगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे. पंजाब हरियाणा, चंडीगड आणि दिल्ली राज्यातही पाऊस पडत आहे.

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. जमीनीलगत वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे काही भागात हवेत गारठा वाढला आहे. यातच उत्तरेकडून वाहणारे थंड आणि समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्यांचा संगम होऊन उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी (ता.११) सकाळपासूनच कोकणासह राज्याच्या काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. सोमवारपर्यंत (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भातही पावसाची शक्यता असून, मंगळवारपासून (ता. १५) विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगाळ हवामान आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *