शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे

एकविसावं शतक हे कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचं, यांत्रिक प्रगतीचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तसेच या शतकातील शेतकऱ्यांनी कृषि क्षेत्रात कमालीची प्रयोगशीलता दाखवली आहे. परंतु उत्पादन वाढीसोबत संसाधनाचं संवर्धन हा आजच्या घडीचा सर्वात महत्वाचा प्रश्न होऊ पाहत आहे. विविध खतांना पिकांचा घटता प्रतिसाद देखील चिंतेचा विषय बनला आहे. पिकांचा प्रतिसाद वाढवण्यासाठी अनेक प्रयोग शेतकऱ्यांकडून केले जात आहे. यातील काही प्रयोग अत्यंत उपयोगी व पर्यावरणास पूरक, तर काही हानिकारकही ठरले आहेत.

मृदेसारख्या नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनात काही प्रयोगांच्या अंमलबजावणीचे अतुलनीय परिणाम आढळून आले आहेत. प्रयोगशीलता नेहमीच कौतुकास पात्र असली तरी, काही प्रयोग आपल्याला विनाशाकडेही नेऊ शकतात. मध्यंतरी महाराष्ट्रातील तसेच देशाच्या काही राज्यांमधील मोजक्या शेतकऱ्यांनी एक प्रयोग सुरु केला. थोड्याच कालावधीत असंख्य शेतकऱ्यांनी त्याचे अनुकरण करत परिणामांची परवा न करता त्यावर अंमल पुकारला. पिकाचा उत्कृष्ट प्रतिसाद, इतर रासायनिक खतांची बचत, उसातील रिकवरी वाढ, अश्या फसव्या वा तात्पुरत्या फायाद्यासोबत समोर आली ती मिठाची शेती. या नवीन प्रयोगाबद्दल सदर लेखात आपण शास्त्रीय कारणांसह विचार परामर्श करू.

मिठाचा वापर कशासाठी ?

ज्या ठिकाणी भाडे तत्वावारती जमीन वापरून शेती केली जाते. अश्या भागात मिठाचा वापर शेतामध्ये केला जायचा किंवा केला जातो. मिठाच्या वापरामुळे जमिनीची वाढणारी हंगामी उत्पादकता हे त्या मागचे महत्वाचे कारण. काही क्षेत्रातील फळबागांमध्ये मिठाचा वापर केला जायचा विशेषतः ज्या जमिनींमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त आहे. अश्या जमिनीत अधिक मिठाचा वापर केला जायचा. या चुनखडीयुक्त जमिनींमध्ये हुमणी, वाळवी सारख्या किडींपासून पिकाचे संरक्षण होण्यास व जमिनीतील कॅल्शीअमची विद्राव्यता वाढवून त्याची दाहकता कमी करण्यास मीठ मदत करत असे. परंतु आजकाल सुरु झालेल्या प्रयोगात मिठाच्या वारेमाप वापराशिवाय दुसरे काहीही आढळत नाही. सुरवातीच्या काळात पिकांवरती खात्रीशीर सकारात्मक प्रतिसाद दाखवणारे मीठ मृदेवरती दुरोगामी नकारात्मक, घातक अश्या परिणामांचे मूळ कारण बनू शकते. या मिठाच्या वापरास दुजोरा देणाऱ्या हंगामी उत्पादकता वाढीवर व त्यामागील संभाव्य शास्त्रीय कारणांवर नजर टाकणे अतिशय महत्वाचे आहे.

हंगामी उत्पादकता वाढीची कारणे
 • मिठाच्या वापरामुळे जमिनीतील वाढलेली सोडीअमची मात्रा मातीच्या कणांवरील पालाश या अन्नद्रव्याची जागा घेऊन त्यास पिकाला उपलब्ध करून देते. पालाशची उपलब्धता पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यास व दुष्काळ-सदृश परिस्थितीवर मात करण्यास मदत करते.
 • विशेषत: कोरडवाहू पिकामध्ये पालाशची वाढलेली उपलब्धता व अभिशोषण उत्पन्न वाढीस मदत करू शकते. हवेतील बाष्पाचा कार्यक्षम वापर मिठाच्या (क्लोराइड) कमी प्रमाणात फवारणीमुळे पहावयास मिळतो.
 • सोडीअम या घटकामुळे जमिनीच्या भौतिक गुणधर्मांवरती तात्पुरता सकारात्मत परिणाम होऊन मुळांची वाढ तसेच इतर अन्नद्रव्यांच्या उपलब्धेतेतही वाढ पहावयास मिळते.
 • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मिठाचा वापर जमिनीचा सामू काही प्रमाणात नियंत्रित केला जाऊन कॅल्शीअमची दाहकता कमी केली जाऊ शकते.
 • शर्कराकंद सारख्या पिकांमध्ये सोडीअम या घटकाची आवश्यकता जास्त असून, या ठिकाणी मिठाचा फायदा पहावयास मिळू शकतो.
 • सोडीअम घटक पिकास “हितकारक” या वर्गामध्ये येतो. याचे कार्य दुष्काळ सदृश परिस्थितीतून “परासरण नियंत्रण” प्रक्रियेद्वारे पिकाचे संरक्षण करणे आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा पिकास होऊ शकतो.
 • वरील सर्व परिणाम सकारात्मक जरी असले तरी ते तात्पुरते आहेत आणि मिठाचा सातत्यांने वापर हा मृदेच्या भौतिक गुणधर्मांवरती नकारात्मक परिणाम करू शकतो.
मिठाच्या वापराचे मृदेवर होणारे संभाव्य दुरोगामी परिणाम
 • मिठाच्या वापराबद्दलची साशंकता मूलतः बागायत क्षेत्रामधील वापराबद्दल आहे.
 • मिठाच्या सतत व अवाजवी वापरामुळे मातीच्या कणांवर सोडीअम ची मात्रा वाढू शकते.
 • कार्बोनेट सारख्या घटकांसोबत सोडीअमचे संयोजन होऊन जमीन चोपण होण्यास कारणीभूत ठरू शकते.
 • सोडीअमचा खनिज स्रोत अल्बाइट हा बहुतांश जमिनीत पुरेश्या प्रमाणात आढळतो. आणि पिकासाठी सोडीअम अत्यावश्यक नसून, हीतकारक वर्गात असल्यामुळे त्याचा बाहेरून वापर करण्याची गरज नसते.
 • चोपण जमिनींचे क्षेत्र सातत्याने वाढत असून, मिठाचा वापर त्यात भर घालण्याचे कार्य करेल.
 • अति प्रमाणातील सोडीअम परासरण संतुलन बिघडवून पिकास विशेषतः पिकांच्या मुळास घातक ठरू शकतो.
 • मिठाच्या अधिक वापरामुळे जमिनीतील जैवविविधता धोक्यात येण्याची देखील संभाव्यता असते.
  (सदर धोके मिठातील प्रमुख घटक सोडीअम व क्लोराइड मुळे जमिनीत घडून येणाऱ्या व अप्रत्यक्ष संबंध असलेल्या मुलभूत रासायनिक अभिक्रीयांवर आधारित आहे. )

सदर मीठ वापराचा फवारणीद्वारे आणि जमिनीतून कोरडवाहू ज्वारी पिकावर व तसेच मृदेवरती होणाऱ्या परिणामांचे दीर्घकालीन संशोधन या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर सुरु करण्यात आले आहे. मिठाचा वापरामुळे तात्पुरते उत्पादन वाढून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जमिनीचे आरोग्य पणाला लागणार असेल तर यावरती नक्कीच विचार करायला हवा. पिक उत्पादन वाढ या विषयात शाश्वत उपाययोजनांना महत्व देणे काळाची गरज आहे. येणाऱ्या आव्हानांवर आणि संकटांवर मात करत असताना आपली प्रयोगशीलता विनाशकाले विपरीत बुद्धी ठरणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

लेखक शुभम दुरगुडे हे मृदविज्ञान आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत. डॉ. अनिल दुरगुडे म. फु. कृ. वी. राहुरी येथील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात कार्यरत आहेत. मो. ९४२०००७७३१/ ९४२०००७७३२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *