राज्यात सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस

सप्टेंबरअखेरपर्यंत ११६५ मिलीमीटरची नोंद

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात ११६५ मिलीमीटर (१६ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर विदर्भात मात्र उणे १० टक्के पावसाची नोंद होत पावसाने सरासरी गाठली.

दुष्काळी भागात यंदा वरूणराजाची कृपादृष्टी राहिली, तर उत्तर कोकण व लगतच्या घाटमाथ्यावर मात्र पावसाचा जोर काहीसा कमी असल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्रातील नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला. विदर्भातील अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत खुप कमी पावसाची पावसाची नोंद झाली आहे. पावसाने समाधानकारक हजेरी लावलेल्या भागातील धरण, तलाव, बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला असून, भूजल पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात सरासरी १००४.२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने ११६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणात ३६६२.७ मिलिमीटर (२७ टक्के अधिक), मध्य महाराष्ट्रात ९६६.६ मिलिमीटर (२९ टक्के अधिक), मराठवाड्यात ८६६.१ मिलिमीटर (३० टक्के अधिक), तर विदर्भात ८५१.९ मिलिमीटर (१० टक्के कमी) पावसाची नोंद झाली आहे.

मॉन्सून हंगामात राज्यातील विभागनिहाय पडलेला पाऊस

विभागसरासरीपडलेलाटक्केवारी
कोकण२८७५.३३६६२.७२७
मध्य महाराष्ट्र७५१.२९६६.६२९
मराठवाडा६६८.८८६६.१३०
विदर्भ९४३.१८५१.९उणे ७
सौजन्य : भारतीय हवामान विभाग

नगरमध्ये धुव्वाधार, अकोल्यात ओढ

जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची विचार करता, यंदा नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. नगर जिल्ह्यात सरीसरीपेक्षा ७८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा ६४ टक्के अधिक पावसाची, तर मुंबई उपनगरामध्ये सरासरीपेक्षा ६७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात मात्र पावसाने ओढ दिली असून, अकोला जिल्ह्यात सरीसरीच्या तुलनेत २७ टक्के कमी, यवतमाळमध्ये २४ टक्के, तर अमरावती जिल्ह्यात २० टक्के कमी, तर चंद्रपूर जिल्ह्यातही यंदा सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

सौजन्य : भारतीय हवामान विभाग

देशात १०९ टक्के पावसाची नोंद

यंदाच्या मॉन्सून हंगामात आतापर्यंत देशातही समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात पडणाऱ्या पावसाची सरासरी ८८०.६ मिलिमीटर आहे. यावर्षी देशात ९५७.६ टक्के पावसाची (९ टक्के अधिक) नोंद झाली आहे. देशातील ३६ प्रमुख हवामान विभाग विचारात घेता, सिक्कीममध्ये यंदा सर्वाधिक (६० टक्के अधिक)पावसाची, तर लडाखमध्ये सर्वात कमी ( उणे ६७ टक्के) पावसाची नोंद झाली. गुजरात, बिहार, मेघालय, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. जम्मु काश्मिर, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, मणिपूर, मिझोराम, नागालॅण्ड विभागातही पावसाने ओढ दिली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

देशातील मॉन्सूनची वैशिष्ट्ये

  • १९९० पासून तिसऱ्यांदा पडलाय सर्वाधिक पाऊस
  • १९९४ मध्ये ११२ टक्के, २०१९ मध्ये ११० टक्के पावसाची झालीये नोंद
  • १९५८ आणि १९५९ नंतर, २०१९ आणि २०२० मध्ये सलग दोन वर्ष झालाय दमदार पाऊस
  • जून महिन्यात ११८ टक्के, जूलै ९० टक्के, ऑगस्ट १२७ टक्के, तर सप्टेंबर महिन्यात १०४ टक्के पावसाची नोंद.
  • मॉन्सून हंगामात निसर्ग हे एक चक्रीवादळ आले. तर एकूण अकरा कमी दाबाची क्षेत्र तयार झाली.

मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात जिल्हानिहाय पाऊस

जिल्हासरासरीपडलेलाटक्केवारी
मुंबई शहर२०२१.४३२०२.८५८
पालघर२३०५.४२६०१.५१३
रायगड३१४८.७३६३०.९१५
रत्नागिरी३१९५.१३९५३.८२४
सिंधुदुर्ग२९४०.५४४८५.४५३
मुंबई उपनगर२२०५.८३६८६.८६७
ठाणे२४३३.४२८८२.०१८
नगर४४८.१७९७.९७८
धुळे५३५.१७८८.३४७
जळगाव६३२.६७८४.३२४
कोल्हापूर१७३३.१२१३२.३२३
नंदूरबार८६०.४९४४.०१०
नाशिक९३३.८११०७.७१९
पुणे८६१.५१२०२.६४०
सांगली५१४.५६४९.७२६
सातारा८८६.२९४२.५
सोलापूर४८१.१६०१.२२५
औरंगाबाद५८१.८९५५.६६४
बीड५६६.१८२४.१४६
हिंगोली७९५.३८५६.६
जालना६०३.१८३५.७३९
लातूर७०६.०९०८.८२९
नांदेड८१४.३८८३.१
उस्मानाबाद६०३.१७४४.३२३
परभणी९०६.१७६१.३१९
अकोला६९३.८५०४.५उणे २७
अमरावती८६२.०६९३.७उणे २०
भंडारा११०७.१११५७.७उणे ४
बुलडाणा६५९.४६९३.७
चंद्रपूर१०८३.९८८८.८उणे १८
गडचिरोली१२५४.२११५५.९उणे ८
गोंदिया१२२०.२११२०.९उणे ८
नागपूर९२०.४९८२.४
वर्धा८८४.५८०७.५उणे ८
वाशीम७८९.०९१२.७१६
यवतमाळ८०५.०६१३.३उणे २४
सौजन्य : भारतीय हवामान विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *