मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. यातच बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) मंगळवारी सकाळी आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकून जमीनीवर आले आहे. महाराष्ट्राकडे येणाऱ्या या प्रणालीची तीव्रता कमी होत असली तरी गुरूवारपर्यंत (ता.१५) राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

देशाच्या संपुर्ण वायव्य भागासह उत्तर भारतातील बहुतांशी भागातून मॉन्सून परतला आहे. मॉन्सूनने संपुर्ण राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागासह गुजरात, अरबी समुद्राच्या काही भागातून माघार घेतली आहे. यातच बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) मंगळवारी सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान आंध्रप्रदेशच्या काकीनाडीलगत किनाऱ्याला धडकून जमीनवर आले आहे.

आंध्रप्रदेश, तेलंगणा मार्गे ही प्रणाली महाराष्ट्राकडे झेपावत आहे. मंगळवारी रात्री उशीरा या वादळीची तीव्रता ओसरणार असून, बुधवारी सकाळपर्यंत कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे राज्यात जोरदार वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी राज्यात अतिदक्षतेचा ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ आलर्ट देण्यात आला आहे.

वादळी प्रणालीची संभाव्य वाटचाल (सौजन्य : हवामान विभाग)

महाराष्ट्रात मात्र परतीचा पाऊस धुमाकुळ घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी २०० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. पुढील तीन ते चार दिवस शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. सोयाबीन, भात, कापूस, मक्यासह खरीपाची काढणीर आलेली पिके तत्काळ काढून सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सौजन्य : हवामान विभाग

अतिदक्षतेचा ‘ऑरेंज आलर्ट’ देण्यात आलेले जिल्हे (स्त्रोत : हवामान विभाग)

बुधवार (ता. १४)
नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी.

गुरूवार (ता. १५)
लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड.

शुक्रवार (ता. १६)
पुणे, सातारा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *