जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

पुणे : बदली किंवा नेमणूकीसाठी राजकिय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिफारस करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. उपअभियंता पदाचा अतिरिक्त पदभार आपल्याकडेच ठेवावा, म्हणून एका शाखा अभियंत्याने चक्क ठेकेदारांचे शिष्टमंडळ आणून जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घडवून दिली. या ठेकेदारांनी संबंधित शाखा अभियंता यांच्याकडे पदभार ठेवावा अशी गळ घातली. या प्रकाराने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली.

एका पंचायत समितीमधील शाखा अभियंत्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. या तालुक्यातील बांधकाम उपअभियंता यांचे पद एप्रिलपासून रिक्त आहे. त्याचा अतिरिक्त पदभार संबंधित शाखा अभियंता यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी जिल्हा परिषदेकडे आलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात काही ठेकेदारांनी येऊन तक्रारी केल्या होत्या. तसेच एका महिला सदस्य यांनी देखील तक्रार करून पदभार काढून, उपअभियंता दर्जाच्या अधिकार्‍याकडे तो सोपवावा, अशी मागणी केली होती.

संबंधित उप अभियंता यांनी स्वतःचे समर्थन करणाऱ्या ठेकेदारांना काल जिल्हा परिषदेमध्ये आणले. या ठेकेदारांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांची पदासाठी शिफारस केली. त्यामुळे अधिकारी अवाक झाले. ही चर्चा पदाधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. इतिहासात प्रथमच घडणाऱ्या या प्रकाराची जिल्हा परिषदेत खमंग चर्चा सुरू आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेतही या प्रकाराचे पडसाद उमटणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *