डिसेंबरअखेरपर्यंत कामे पुर्ण करण्याचे आदेश

पुणे : अंगणवाडी इमारतींची बांधकामे वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षीत असताना मागील तीन वर्षात मंजूरी दिलेल्या ४३० इमारतींची पैकी केवळ ११५ कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे १३३ इमारतींची कामे अद्याप सुरूच झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत कामे पुर्ण करावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी अंगणवाडी बांधकाम, दुरूस्ती आणि तेथील शौचालयाचे कामे करण्यास मंजुरी दिली जाते. मागील तीन वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण अंगणवाडी बांधकामांना ४३० मंजुरी देण्यात आली त्यामध्ये २०१७-१८ मध्ये ९१ इमारती, २०१८-१९ मध्ये १०४ तर २०१९-२० मध्ये २३५ अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली. अंगणवाडी इमारत बांधकामाच्या मंजूर ४३० कामांपैकी १६८ कामे अपूर्ण असून, १३३ कामे सुरू झाली नाहीत. तसेच १४ कामे रद्द करण्यात आली आहे.

अंगणवाडी इमारत दुरूस्ती आणि शौचालय उभारणीच्या कामांसाठी निधी उपलब्ध होऊनही अनेक कामे अपुर्ण व दुर्लक्षित असल्याचे दिसून आले आहे. याबाबत सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करून अहवाल सादर करावा. कामात दिरंगाई केलेल्यांची माहिती घेऊन त्याबाबत खुलासा सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *