पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन सज्ज अद्ययावत रुग्णवाहिका ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्याचा पुणे जिल्हा परिषदेच्या प्रयोगाची देशभर चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रातील भंडारा, नगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांतूनही त्याची माहिती घेतली जात असल्याने रुग्णवाहिका खरेदीचा ‘झेडपी पॅटर्न’ देशभर पोहोचला आहे.

पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात बाधित रुग्णांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालय अथवा तालुक्याच्या ठिकाणच्या रुग्णालयात पोहोचण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिकेची गरज असते. श्वासोच्छवास घेण्यासाठी अडचण झाल्यास त्यावेळी ऑक्सिजनसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील ही अडचण ओळखून चौदा आणि पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदांना मिळणाऱ्या अनुदानातून ही रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

त्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव पुढे ग्रामपंचायतींनी स्वीकारला. जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्या प्रत्येक केंद्रांसाठी एक ऑक्सिजनसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची ही योजना आहे. त्यामुळे त्या भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका कोरोनाच्या साथीच्या काळात तसेच कायमस्वरुपी उपलब्ध होईल, असा हेतू ही योजना राबविण्यामागे होता.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद म्हणाले, ‘पुणे जिल्हा परिषदेने आतापर्यंत अद्ययावत ५१ रुग्णवाहिका खरेदी करून आरोग्य केंद्रासह गावांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना कायमस्वरुपीची सुविधा उपलब्ध झाली आहे. ५१ रुग्णवाहिका खरेदी करून त्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे. ९६ पैकी ९० आरोग्य केंद्रांना या रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्यापैकी ५१ दिल्या असून उर्वरीत लवकरच खरेदी करण्यात येतील. या पुणे जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिकेच्या पॅटर्नची आता अन्य जिल्ह्यांनी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.’

आयुष प्रसाद म्हणाले, नगर जिल्ह्यातील आमदार रोहित पवार, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, उस्मानाबाद येथील राणा जगजितसिंह या तीन आमदार, मंत्र्यांनी आपल्या प्रयोगाची माहिती घेतली आहे. तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांनी देखील या प्रयोगाची दखल घेऊन या प्रकल्पाची माहिती घेतली आहे. ग्रामपंचायतींना एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका खरेदी करून देण्याचा पहिलाच प्रयोग राज्यात पुणे जिल्हा परिषदेने राबिवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: