राजस्थानमधून सोमवारपर्यंत माघारी फिरण्याची शक्यता

पुणे : देशासाठी वरदान असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) माघारीस पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारपर्यंत (ता. २८) मॉन्सून वारे पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरूवात करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार यंदा १ जून रोजी देवभूमी केरळमध्ये दाखल झाला. ११ जून रोजी महाराष्ट्रात डेरेदाखल झालेल्या मॉन्सूनने १४ जून रोजी पुर्ण राज्य व्यापले. उत्तरेकडे वेगाने वाटचाल करत १२ दिवस आगोदरच संपुर्ण देशात मजल मारली. महाराष्ट्रसह देशभरात मॉन्सूनने सामधानकारक हजेरी लावली आहे. शनिवारपर्यंत (ता. २६) देशात ९४५.७ मिलीमीटर (१०९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, इशान्य भारतातील नागालँड, मनिपूर, मिझोराम वगळता राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडला आहे.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर रोजी मॉन्सून १७ सप्टेंबर रोजी माघारी फिरणे अपेक्षित होते. दहा दिवस उलटूनही वारे माघारी फिरलेले नाही. मात्र राजस्थानात हवामान कोरडे होत असून, मॉन्सूनच्या माघारीस पोषक हवामान झाले आहे. सोमवारपर्यंत मॉन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यात हलक्या पावसाची शक्यता
बिहार आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी (ता. २६) निवळण्याची शक्यता आहे. राज्यातही पावसाचा जोर ओसरला असून, काही भागात ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी कोसळत आहेत. पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *