वसू भाजी

शास्त्रीय नाव – ट्राएन्थेमा पोरच्युलेकास्ट्रम (Trianthema Portulacastrum )
कूळ – आयझोएसी (Aizoaceae )
इंग्रजी – ब्लॅक पीगवीड (Black Pigweed)
वसू ही रोपवर्गीय वर्षायू जमिनीवर पसरत वाढणारी वनस्पती आहे. ही हुबेहूब घोळ तसेच पुनर्नवा या वनस्पतींसारखी दिसते. वसू महाराष्ट्रात सर्वत्र ओसाड, पडीक जमिनीवर, शेतात, बागांमध्ये, रस्त्यांच्या कडेने वाढलेली दिसते. पावसाळ्यात हमखास आढळते.

औषधी गुणधर्म

  • वसू ही वनस्पती शोथशामक औषधी म्हणून प्रसिद्ध आहे.
  • वसूने आतड्यांत तीव्र दाह निर्माण होतो. गरोदरपणात वसूचे मूळ देऊ नये.
  • ज्या रोगात तीव्र जुलाबाची जरुरी असते, त्या रोगात वसू देतात.
  • यकृतांतून रक्ताभिसरणास अडथळा होऊन उत्पन्न झालेल्या विकारात, मलावंष्टभ, त्वचेच्या रोगांत आणि पांडुरोगात वसू गुणकारी आहे.
  • औषधासाठी वसूच्या मुळाचे चूर्ण सुंठीबरोबर देतात. वसूची मोठी मात्रा न देता थोडी थोडी मात्रा दर तीन तासांनी देतात.
  • वसूची भाजी खोकला व दमा या विकारात उपयुक्त आहे.
  • शरीरातील वात कमी करण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो.
  • यकृताचे विकार, त्वचारोग, कुपचन यांमध्ये वसूची भाजी अत्यंत गुणकारी आहे.

वसूचे पराठे

साहित्य
चिरलेली वसूची भाजी एक वाटी, हळद, लसूण, जिरे, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, गव्हाचे पीठ दोन वाट्या, तूप इ.

कृती

  • वसूची भाजी स्वच्छ धुऊन निथळत ठेवावी. नंतर बारीक चिरून घ्यावी.
  • लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर व मीठ यांची पेस्ट बनवावी.
  • गव्हाच्या पिठाची कणीक मळताना ही पेस्ट व चिरलेली भाजी, जिरेपूड व हळद टाकावी.
  • मळलेल्या कणकेचे छोटे-छोटे गोळे करून, नंतर लाटून, पराठे तुपावर भाजावेत.
  • गरम गरम पराठे चवदार लागतात.

सौजन्य : विकासपिडीया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *