zilla parishad

घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पास मिळणार निधी

पुणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) पहिल्या टप्प्यात पुणे जिल्हा हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता दुसर्‍या टप्प्यासाठी देखील पुणे जिल्ह्याची निवड महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रकल्प उभारणीस केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे.

शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन- ओडीएफ प्लस संकल्पनेंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आल्याचे पत्र सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना पाठविण्यात आले आहे. ओडीएफ प्लस संकल्पनेंतर्गत प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या मोठ्या गावांचा समावेश असेल. त्यामुळे गावांमध्ये कचर्‍यामुळे पसरणारी दुर्गंधी त्याचबरोबर त्यामुळे पसरणारे आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने म्हणाले, शासनाकडे आराखडा पाठवला होता. त्या आराखड्यानुसार कामे केली जाणार आहेत. शासनाने या अभियानात समाविष्ट करून घेतल्याने घनकचर्‍याची कामे होण्यास मदत होणार आहे. याशिवाय पूर्वी शिल्लक राहिलेली शौचालयांचे कामे पूर्ण होतील.

ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी मदत होईल व सर्व कामे मार्गी लागतील. विशेषतः पुणे शहरा लगतच्या मोठ्या गावांमध्ये निर्माण झालेली घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा बिकट प्रश्न मार्गी लागेल.

– निर्मला पानसरे,अध्यक्षा, जिल्हा परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *