महाऊर्जाकडे पाठपुरावा करूनही तोडगा नाही

जिल्हा परिषद अध्यक्षांनी मागवला योजनांचा अहवाल

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी मोठ्या थाटात महाऊर्जाकडून सुरू करण्यात आलेल्या सौर नळ पाणी पुवठा दोन वर्षातच बंद पडल्या आहेत. ४५ योजनांपैकी १४ योजना बंद असून, ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. योजनांच्या दुरूस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांनी कुठलीच दखल घेतली नसल्याने या योजनांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिले आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. महिलांना डोक्यावर हंडा घेऊन कित्येक किलोमिटर पायी जावे लागते. यामुळे सौर उर्जेवर कार्यान्वित असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना करण्यासाठी महाऊर्जामार्फत २०१८ ला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार महाऊर्जाने जवळपास ४५ गावात सौर नळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आला. एका योजनेसाठी जवळपास ५ लाख खर्च आला. मात्र, त्यानंतर या योजनेच्या सौर पंपात बिघाड झाल्याने या योजना बंद पडल्या. सुरवातीच्या काळात महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्या दुरुस्त केल्या. मात्र, त्यानंतर या कडे दुर्लक्ष झाले.

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीत या योजनांचा आढावा घेतल्यावर ही बाब उघड झाली. या योजना पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांशी वारंवार दुरध्वनीवरून संपर्क साधण्यात आले. मात्र, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आढावा घेतला असता ४५ पैकी १४ योजना बंद असल्याचे कळाले. हा आकडा जास्त असल्याच्या शक्यतेमुळे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी शाखा अभियंता यांना सर्व तालुक्यात जाऊन योजनांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पानसरे यांनी दिले आहे.

वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सुचना
सौर नळपाणी पुरवठा योजना का बंद पडल्या? त्यांची कारणे काय ? पाठपुरवा करण्यात आला होता काय? या योजना किती दिवसांपासून बंद आहेत याचा तपशिल शाखा अभियंत्यांनी घ्यावा. ग्रामसेवकाच्या साह्या घेऊन, त्याचा वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेशही अध्यक्ष पानसरे यांनी दिले आहेत आहेत.

दहा अश्वशक्तीच्या प्रकल्पास मान्यता
जिल्ह्यात इतरही नळ पाणी पुरवठा योजनांना सौर पंप बसविण्याबाबत बैठकीत तांत्रिकदृष्ट्या चर्चा करण्यात आली. बऱ्याच नळ पाणी पुरवठा योजना ह्या थकीत वीज बिलामुळे बंद होतात. सौर उर्जा प्रकल्पाचा आधार घेतल्यास या सर्व योजना कार्यान्वित होऊ शकतात. परिणामी मोठ्या प्रमाणात वीज बचत होऊ शकते. यामुळे भविष्यात सौर पंप नळ पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी १० अश्वशक्ती क्षमतेच्या प्रकल्पास तांत्रिक मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *