अध्यक्षा निर्मला पानसरे यांची माहिती

पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्यासाठी (ओडीएफ प्लस) जिल्ह्याची निवड झाली आहे. या टप्यात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन अधिक भर देण्यात येणार असून, शौचालय बांधकाम देखील केले जाणार आहे. यासाठी २९० कोटी ५४ लाख ६२ आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा २०१७ मध्ये हगणदारी मुक्त करण्यात आला. यात जिल्ह्यातील ६ लाख ३६ हजार ३६ कुटुंबांपैकी १ लाख ७४ हजार ६३९ तसेच पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेले १ लाख ९० हजार ८३ अशा एकुण १ लाख ९३ हजार ७२५ कुटूंबांनी वैय्यक्तिक स्वच्छतागृहे बांधली. याच अभियानाचा आता दुसरा टप्पा जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी, स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि विविध योजनातून ही कामे केली जाणार आहेत.

दुसऱ्या टप्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. यासाठी विविध प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. औद्योगिकरण आणि नागरिकीकरण वाढत असल्याने गावस्तरावर कचरा व्यवस्थापनासाठी गावागावातील माहिती मागवली. या माहितीच्या आधारे प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार घनकचरा प्रकल्प आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी शाखा अभियंता, उपअभियंता यांच्याकडून मान्यता घेऊन कामांना सुरूवात केली जाणार आहे.

असा आहे आराखडा
शासनाला सादर करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी २१८ कोटी ६९ लाख ८९ हजार रुपये, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय बांधकामसाठी ४८ कोटी ६० लाख ३६ हजार रूपये, तसेच अनुषांघिक खर्चासाठी २३ कोटी २४ लाख ३७ हजार रूपये असा एकूण २९० कोटी ५४ लाख ६२ आराखडा तयार करण्यात आला आहे, असे पानसरे यांनी सांगितले.

या कामांसाठी मिळणार निधी

  • घनकचऱ्याचे संकलन आणि वर्गीकरण
  • ओला सुका कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया
  • गावातील स्वच्छता
  • प्रकल्पाची देखभाल दुरूस्ती
  • सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन
  • कचरा संकलन कुंड्याची व्यवस्था
  • कचरा वाहतुकासाठी वाहनांची व्यवस्था
  • कचरा साठवणूक व प्रक्रिया केलेल्या खतासाठी गोडाऊन
  • सर्वच कुटुंबांना शौचालयांची सुविधा
  • गावांमध्ये सामुदायीक शौचालय संकुल
  • शासकीय कार्यालये. शाळा, अंगणवाडीत शौचालय सुविधा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *