थेट लाभ हस्तांतरणानुसार सवलत जमा होणार

पुणे : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून तीन लाखांपर्यंत शुन्य टक्के दराने व्याज पीक कर्ज पुरवठा केला जातो. मात्र यासाठी शेतकऱ्यांना आता पुर्ण सहा टक्के व्याजाने परतफेड करावी लागणार आहे. व्याजाची सवलत थेट लाभ हस्तांतरणानुसार (डीबीटी) नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या निणर्यानुसार प्राथमिक शेती सहकारी संस्थांच्या शेतकरी सभासदाना बँकेमार्फत सहा टक्के व्याजदराने पीक कर्ज पुरवठा करण्यात येतो. पीककर्जाची ३६५ दिवसात वेळेवर परतफेड करणाऱ्या सभासदांना तीन लाखापर्यंतच्या रकमेसाठी केंद्र शासनाकडुन तीन टक्के तसेच राज्य शासनाकडुन एक टक्का व्याज सवलत मिळते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्वत:च्या नफ्यातुन सभासदांना आणखी दोन टक्के सवलत देत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना शुन्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध होते.

केंद्र व राज्य सरकारकडून सवलत रक्कम एक ते दीड वर्षांनी मिळत असली तरी, त्याची वाट न पाहता जिल्हा बँक सर्व व्याज सवलतीचा लाभ सभासदांना देते. तीन लाखापर्यंत शुन्य व्याज सवलतीचा लाभ देणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील एकमेव बँक आहे. सन २०२०-२१ थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) पध्दतीचा अवलंब करण्यात येणार असून, कर्जदार शेतकरी सभासदांच्या बचत खात्यावर व्याज सवलतीची रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचे शासनाने कळविले आहे.

सभासद शेतकऱ्यांना यापुढे प्रथम व्याजासहीत पीककर्जाची परत फेड करावी लागणार आहे. शासनाकडून शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर व्याज सवलतीची रक्कम नंतर जमा केली जाणार आहे. शुन्य टक्के व्याजाच्या सवलतीचा लाभ शेतकरी सभासदांना पूर्वी प्रमाणेच मिळणार आहे. त्यासाठी दोन व्याज सवलत रक्कम बँक स्वत:च्या सभासदास देणार आहे.

– प्रतापसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *