शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे

पिकांना अन्नद्रव्यांच्या पोषणापासून ते पिकांच्या अंतिम उत्पनामध्ये मृदेचा वाटा लक्षात घेता तिच्या संवर्धनाला असाधारण महत्व आहे. मृदेचे भौतिक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्म हे हवामानानुसार बदलत असतात. जागतिक हवामान बदलाची श्रेणी, हवेतील वाढत्या कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण आणि हवेतील नत्राचे जमिनीतील स्थिरीकरण, सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टींचे आपसामध्ये संतुलन असणे अतिशय महत्वाचे आहे.

पृथ्वीच्या निर्मिती पासून जागतिक हवामानाचे मापदंड बदलत गेले. तापमान आणि पर्जन्यमान जागोजागी बदल झाले. जागतिक सरासरी वार्षिक तापमानात गेल्या शंभर १०० वर्षात १५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. जागतिक हवामान बदलास तसे अनेक घटक कारणीभूत आहे परंतु या जागतिक हवामान बदलाचे कृषी घटकांवर होणारे परिणाम मुख्यत: जमिनीवर म्हणजेच मृदेवरती होणारे परिणाम अभ्यासले गेले पाहिजेत. इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नुसार पूर्व औद्योगिक युगा पासून ते सन २००५ पर्यंत हवामानामध्ये कार्बन डायऑक्साइड, क्लोरो-फ्लूरो कार्बन, नायट्रस ऑक्साइड, मिथेन ह्या वायूंचे प्रमाण असाधारण रित्या वाढले आहे तसेच यांनी ठरवून दिलेल्या हवामानाच्या इतर अनुकूल मापदंडांमध्ये सुद्धा अनपेक्षित बदल घडून येत आहेत. ह्या बदलांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम कृषी व इतर घटकांवर ठळक पाने दिसून येत आहते. त्याबाबत संसाधनाच्या जतनासाठी आपण प्रयत्नशील झालं पाहिजे.

जागतिक हवामान बदलाला कारणीभुत घटक

 • हवामान हा घटक अतिशय गतिशील असून, लाव्ह्याचे उत्सर्जन, भूकंप, पृथ्वीचे परिभ्रमण, एल्-निनो परिणाम अशा पृथ्वीच्या अनेक भौतिक घटना हवामान बदलासाठी कारणीभूत ठरतात.
 • जितक्या प्रमाणात पृथ्वीवरील वनस्पती कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन करत नाही. तितक्या प्रमाणात आज मनुष्यामुळे कार्बन डायऑक्साइड चे उत्सर्जन हवामानात होते आहे, वाढती लोकसंख्या हि प्रमुख समस्या.
 • जीवाश्म इंधन वापरामुळे हरितगृह वायूंमध्ये लक्षणीय वाढ होते आहे. जागतिक हवामान बदलामध्ये कार्बन डायऑक्साइड, क्लोरो-फ्लूरो कार्बन, नायट्रस ऑक्साइड, मिथेन या वायुंचा मोठा वाटा आहे.

जागतिक हवामान बदलाचे मृदेच्या कार्यप्रणालीवर होणारे परिणाम

 • ही एक मंद आणि जटील प्रक्रिया असून, जमिनीच्या पुढील गुणधर्मांवरती त्याचे दृश्य व अदृश्य परिणाम होतात
 • जमिनीतील पाण्याचे वाढते बाष्पिभवन, घटते पर्जन्यमान, व पर्यायाने होणारी जमिनीची धूप.
 • वाढत्या तापमानामुळे जमिनीतील जैव पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रीये वर नकारात्मक प्रभाव.
 • तापमान वाढी मुळे जमिनीतील तापमानाच्या विभागांमध्ये वैकल्पिक बदल होतात. त्यामुळे जमिनीतील वाढते आकुंचन प्रसारण हे जमिनीचा पोत व मृदेची रचना या दोघांसाठी अपायकारक ठरते.
 • जमिनीची पाणी धरून ठेवण्याची व तसेच निचऱ्याची क्षमता कमी होते आहे.
 • जैवपदार्थांचे म्हणजेच जमिनीतील सूक्ष्म जीवाणूच्या मुख्य अन्नाचे घटते प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी दिवसेंदिवस घातक ठरत आहे.
 • जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे चक्र जागतिक तापमान वाढीमुळे मोडकळीस येत असून त्याचे व्यवस्थापन काळाची गरज बनली आहे.
 • अतिशय आम्लधर्मी, अतिशय विम्लधर्मी किंवा क्षारयुक्त चोपण अश्या अनेक समस्याप्रधान जमिनींमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे
 • खतांना पिकांचा घटता प्रतिसाद, घटती उत्पादकता हे जागतिक तापमान वाढीचे अदृश्य परिणाम आहेत.

एकंदरीत मृदेची मृदावरणावरील अखिल सजीवांचे पोषण करण्याची क्षमता लक्षात घेता तिचे जतन आज फक्त काळाची गरजच नव्हे तर आपले आदिम कर्तव्य बनले आहे. जागतिक हवामान बदल हा जरी जागतिक पातळीचा प्रश्न असला तरी या समस्येचे मुळ पातळीवर निवारण गरजेचे आहे. त्यासाठी पुढील काही उपाययोजना उपयोगी ठरतील.

जागतिक हवामान बदल आणि मृदा संवर्धन

 • जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा व हिरवळीच्या खतांचा वेळोवेळी वापर करावा.
 • सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वाढीसही मदत होते.
 • एकीकडे सेंद्रिय कर्बाचे प्रणाम वाढवत असताना जर आपण आपल्या शेतीतंत्रा मध्ये बदल केला नाही तर त्या कर्बाचे पुन्हा नुकसान होण्याची शक्यता असते.
 • जमिनीच्या अवाजवी मशागतीवर नियंत्रण ठेवावे.
 • रासायनिक खतांचा माती परीक्षणं नुसार व संतुलित वापर करावा.
 • शेतीसाठी वापरल्या जाण्याऱ्या पाण्याची गुणवत्ता व त्यानुसार पिक व पाणी व्यवस्थापन करावे.
 • मृदेची धूप रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबावाव्यात.
 • उपलब्ध व पावसाच्या पाण्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करावे.
 • एकपिक पद्धतीत बदल करून एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा.

लेखक – शुभम दुरगुडे हे जि. बी. पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, पंतनगर. येथे मृदविज्ञान आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत. डॉ. अनिल दुरगुडे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मृदविज्ञान विभागात कार्यरत आहेत. भ्रमणध्वनी – ९४२०००७७३२, sdurgude0038@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: