शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे

महाराष्ट्रातल्या जमिनी दक्खनच्या काळ्या कातळा पासून (बेसाल्ट) बनलेल्या आहेत. पाऊस, ऊन, हवा, सूक्ष्मजीव, उतार, वनस्पतींच्या मुळ्या इत्यादीमुळे खडकाची झीज होऊन माती झाली. हीच माती वनस्पतींसाठी अन्नद्रव्यांचा स्रोत व आधार ठरते. कमी पाऊस आणि उष्ण कोरड्या हवामानामुळे बेसाल्ट खडकापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जमिनी हलक्या ते खोल काळ्या रंगाच्या झाल्या आहेत. याउलट याच खडकावर जास्त पाऊस पडल्यामुळे लाटेराय्झेषण प्रक्रिया सुरु झाली आणि आयर्न व आल्युमिनियम ऑक्सांइड शिल्लक राहिले, आणि त्यामुळेच कोकणातील जमिनींचा रंग आपणास लाल दिसतो.

या सर्व जमिनींचे खोलीनुसार प्रकार पडतात. हलक्या जमिनीचे (२५ सेमी पेक्षा कमी खोली) प्रमाण ३७.७ टक्के आहे, मध्यम खोल जमिनीचे (२५-५० सेमी खोली )प्रमाण ३०.९ टक्के आहे. खोल काळ्या जमिनीचे (५० सेमी पेक्षा जास्त खोली) प्रमाण २६.३ टक्के आहे तर कोकणातील लाल तांबड्या जमिनीचे प्रमाण ५.६ टक्के आहे. पश्चिम महाराष्ट्रात रेड बोल (भाजलेल्या लाल मातीचे थर) आढळून येतात. परंतु त्यांचे गुणधर्म कोकणातील लाल मातीसारखे नसतात. ह्या रेड बोल मातीचा लाल रंग फार वर्षांपूर्वी लाव्हा रसामुळे माती विटांप्रमाणे भट्टीत भाजल्यामुळे तयार होतो. ही माती निकस असून, त्यात चुनखडीचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. म्हणून ही घाटावरची लाल माती शेडनेट मध्ये वापरताना चुनखडीचे प्रमाण तपासूनच (मुक्त चुनखडी ५ % पेक्षा कमी असावे) वापरावी.

कृषी हवामान विभाग व जमीन घडण

महाराष्ट्र राज्यात कृषी हवामान ९ विभागात मोडते. पहिला विभाग १ हा जास्त पावसाचा व जांभ्या जमिनीचा प्रदेश आहे. विभाग २ हा जास्त पावसाचा परंतु जांभ्या जमिनी विरहित प्रदेश येतो . हे दोन्हीही विभाग कोंकण विभागातील आहे. विभाग ३ हा घाटमाथ्याच्या प्रदेशात येतो. तर विभाग ४ व ५ हा संक्रमण विभाग असून, पश्चिम घाटातील पर्जन्याछायेतील जिल्ह्यांमध्ये मोडतो. विभाग ६ हा खरीप व रब्बी पिकांचा अवर्षणग्रस्त प्रदेश असून, पावसाचे प्रमाण कमी व अनिश्चित आहे. विभाग ७ हा खरीप पिकांचा निश्चित पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. विभाग ८ अधिक पावसाळी मराठवाडा विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश आहे. शेवटचा विभाग ९ हा संमिश्र खडकापासून बनलेला, जमिनीचा जास्त पावसाळी प्रदेश हा नागपूर उत्तर पूर्व भाग, भंडारा, चंद्रपूर मध्य व पूर्व हा विभाग मोडतो.

जमिनीची सुपीकता

जमिनीतील उपलब्ध असलेल्या गरजेचे सर्व अन्नद्रव्य पिकाला पुरवण्याच्या क्षमतेला जमिनीची सुपीकता म्हणतात. माती परीक्षणाद्वारे जमिनीची सुपीकता ओळखली जाते. एकंदरीतच राज्याचा सुपीकता स्तर नत्राच्या बाबतीत कमी ते मध्यम , स्फुरदाचे प्रमाण कमी ते अंत्यंत कमी आणि पालाश चे प्रमाण भरपूर ते अत्यंत भरपूर आहे. महाराष्ट्रातील सुपीकता निर्देशांकात १९८० ते २००५ या कालावधीत सातत्याने घट होताना दिसून येते (तक्ता क्रमांक १). यामुळेच आज असे दिसून येते की १ किलो अन्नद्रव्य (नत्र + स्फुरद + पालाश) जमिनीत टाकले असता फक्त ६ किलो अन्नधान्य उत्पादन प्रती हेक्टरी मिळते, हेच उत्पादन ह्याच जमिनींतून २५ वर्षांपूर्वी १६ किलो प्रती हेक्टरी मिळत होते. म्हणजेच जमिनीची सुपीकता जवळ जवळ ६२ % ने कमी झाली आहे.

जमिनीचे आरोग्य म्हणजे दीर्घकालीन वनस्पतींना अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन मातीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले असणे, की याद्वारे पर्यावरणातील हवा व पाणी यांचे संवर्धन होईल, याशिवाय अन्त्रधान्य सुरक्षा आणि मनुष्य प्राणिमात्रांचे आरोग्य सुधारले जाईल. जमिनीचे आरोग्य हे जमिनीच्या रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता , सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इ. घटक मोजले जातात. जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे ६.५ ते ८.० पर्यंत असावा, क्षारता ०.१० ते ०.५o डेसीसायमन/ मीटर असावी. चुनखडीचे प्रमाण १० टक्केपेक्षा कमी असावे.

अन्नद्रव्यांचा विचार करता महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त जस्ताची कमतरता ४२.०५ टक्के दिसून येते. त्या खालोखाल लोह (९.०४) या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. तसेच विम्लाधार्मीय चुनखडीयुक्त व कोकणातील तांबड्या जमिनीत बोरोनची सुद्धा कमतरता जास्त ३२ टक्क्यांपर्यंत आढळून येते.(तक्ता क्र.२)

सुपीकता निर्देशांक कमी होण्याची कारणे

  • जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे कमी झालेले प्रमाण.
  • मध्यम ते जास्त विम्लतेकडे वाढत चालला जमिनीतील सामू.
  • सखोल पिक पद्धतींचा वापर
  • असमतोल अन्नद्रव्यांचा वापर
  • अमर्याद सिंचनाचा वापर
  • रासायनिक खते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा
  • जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म
  • कमी होत चाललेली सुक्ष्मजीवाणुंची संख्या
  • जमिनीत वाढत चाललेल्या अपधावाच्या प्रमाणामुळे अन्नद्रव्यांसह वाहून गेलेला सुपीक थर.

शाश्वत उत्पादनासाठी जमिनीच्या आरोग्य व्यवस्थापन

  • चांगले कुजवलेले शेणखत बनविण्याच्या दृष्टीने खड्डा पद्धत अथवा नाडेप पद्धतीने चांगले शेणखत तयार करावे.
  • जास्तीत जास्त जीवाणू खतांचा वापर बीजप्रक्रीयेद्वारे किंवा शेणखतात मिसळून करावा. (उदा.रायझोबियम, अझोटोबॅकटर, पी एस बी, अझोस्पिरीलम, असीटोबॅकटर)
  • पिकांची फेरपालट करून कडधान्य पिकांचा समावेश केल्याने पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थाचे चक्रीकरण होते. तसेच विविध सेंद्रिय खतांचा शिफारशीनुसार वापर करावा.
  • माती परिक्षणानुसार खतांचा समतोल वापर अपेक्षित उत्पादन समीकरणाद्वारे केल्यास जमिनीच्या सुपीकतेबरोबर जमीन आरोग्यही चांगले राहील.
  • माती परिक्षणाद्वारे कमतरतेनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून करावा.
  • माती परीक्षण करून विद्राव्य खतांद्वारे ठिबक सिंचनातून अन्नद्रव्ये पीक वाढीच्या अवस्थेत गरजेनुसार द्यावीत.
  • पाण्याचा अमर्याद वापर न करता, बागायत क्षेत्रामध्ये ठिबक, तुषार, मायक्रोस्प्रिकलर पद्धतीचा वापर वाढवावा.
  • कोरडवाहू भागात मृद व जलसंधारणाची उपाययोजना करणे गरजेचे आहे.
  • शेततळी तयार करून संरक्षित पाण्याचा उपयोग करावा.
  • बागायती क्षेत्रात दोन ते तीन वर्षातून एकदा तरी हिरवळीची पिके म्हणून धेंचा किंवा ताग गाड़ला गेला पाहिजे.
  • फुले येण्यापूर्वी विविध तणे उपटून जागेवरच जमिनीत टाकावेत.
  • क्षारपड जमिनीचे क्षेत्र सुधारविण्यासाठी एकात्मिक पद्धतीने पाणलोट क्षेत्रात जिप्सम शेणखतात मिसळून जमिनीत टाकावे. जादा पाण्याचा पश्चिम महाराष्ट्रातील हलक्या जमिनीचे क्षेत्र ठिबक सिंचनावर आणून कोरडवाहू फळबाग लागवड करणे गरजेचे आहे.
  • जास्त पाणी कमी क्षेत्रावर देण्याऐवजी कमी पाणी जास्त क्षेत्रावर विभागून दिल्यास जमिनी खराब होणार नाहीत तसेच उत्पादनात वाढ होईल आणि सामाजिक समतोल राखला जाईल.
  • जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करून त्यानुसार जमीन सुधारणा व पीक पद्धतीचे नियोजन करावे.
  • शेतातील उरलेले पीक अवशेष न जाळता त्यांचा आच्छादन म्हणून उपयोग करावा किंवा बारीक तुकडे करून जमिनीत मिसळावे, म्हणजे जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढून सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढेल.

जमीन आरोग्य व सुपीकता सुधारण्यासाठी भविष्यात एकात्मिक अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करावे. यामधे प्रामुख्याने माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर, जीवाणू खाते, भरखते व हिरवळीच्या खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांची गरज काही प्रमाणात कमी होऊन अन्नाद्र्याव्यांची कार्यक्षमता वाढेल पर्यायाने जमीन, हवा व पाणी या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होणार नाही.

लेखक : शुभम दुरगुडे हे जि बी पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, पंतनगर. येथे मृदविज्ञान आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत. डॉ. अनिल दुरगुडे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मृदविज्ञान विभागात कार्यरत आहेत. भ्रमणध्वनी ९४२०००७७३२, sdurgude0038@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *