गोचीड हा रक्त शोषणारा बाह्य परजीवी कीटक आहे. तो रक्तपिपासू असून पशुधनाच्या अंगावर राहतो. महाराष्ट्रात झालेल्या गाई व म्हैशीच्या एका अभ्यासातून सुमारे ६७ ते ८७ टक्के प्राण्यांच्या अंगावर गोचीड आढळून आले होते. भारतात सुमारे १६० प्रकारचे गोचीड आढळून येतात. त्यापैकी बुफिलस हायलोमा, एम्बिओमा, रिफीसिफ्यालस इत्यादी गोचीड पशुधनाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत.

सर्व प्रकारचे गोचीड जनावरांचे रक्त पितात. एक गोचीड सुमारे १ ते २ मिली रक्त पितो. त्याचा कालावधी एक ते दोन आठवड्यांचा असतो. पशुधनाच्या अंगावर असंख्य गोचीड असतात. त्यामुळे त्यांना अशक्तपणा येतो. गोचीडाच्या चाव्यामुळे पशुधनाच्या शरीरावर जखमा होतात. त्वचा उघडी झाल्याने त्यातून जंतुसंसर्ग होऊ शकतो. जनावरांचे रक्तपेशींचे रोग जसे बबेसिएसीस, ॲनाप्लाजमोसीस, थायलेरीयासीस व या वर्गातील आजाराचा फैलाव गोचीडांमार्फत होतो व जनावरे रोगग्रस्त होतात. त्यांचे दुध व मांस उत्पादन घटते व पशुपालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.

गोचीड नियंत्रणासाठी सध्या बाजारात अनेक गोचीडनाशक औषधे उपलब्ध आहेत. ती विषारी असल्याने कमी मात्रेत फवारल्यास गीचीड मरत नाही. जास्त मात्रेत फवारल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते. तसेच त्याचा अंश दुधात/मांसात उतरतो. गोचीड नियंत्रणासाठी आयव्हेर्मेक्टीनचे इंजेक्शन व गोळ्या वापरल्या जातात. पण याचा पुन्हा पुन्हा वापर केल्यास त्याची गोचीडांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते. तसेच त्यामुळे प्राण्यांमध्ये न्युरोटॉक्सिसिटी होऊ शकते. त्यांच्या किडनी व लिव्हरवर वाईट परिणाम होतो.

या सर्व गोष्टींचा विचार करून वळूमाता प्रक्षेत्र कोपरगाव, जि. नगर येथे गोचीड निर्मुलनासाठी जैविक पद्धतीचा अवलंब केला गेला. यासाठी मेटऱ्हाझीयम ॲनिसोपली या बुरशीचा वापर करण्यात आला. ही बुरशी उत्तर अमेरिकेतील जंगलामधील मातीमध्ये आढळून येते. ती गोचीड नाशक म्हणून ओळखली जाते. ही बुरशी गोचीडामध्ये बुरशीजन्य आजार निर्माण करून त्यांना नष्ट करते.

मेटऱ्हाझीयम ॲनिसोपली बुरशीचे रिफीसिफ्यालस गोचीडावरील जीवनचक्र या पद्धतीने गोचीड नष्ट होतो.

गोचीड नियंत्रणासाठी मेटऱ्हाझीयम ॲनिसोपली बुरशी ५ ग्रॅम, ५ मिली सोयाबीन तेल, ५ मिली दूध व १ लीटर पाणी या प्रमाणात एकत्र करून फवारण्यात यावी. सदर फवारणी पावसाळ्यात शक्यतो दमट हवामानात करण्यात यावी. गोठयातील ओलसर जागा गव्हाणी भिंती, जमीन पाण्याच्या टाकीजवळच्या ओलसर जागा आवर्जून एकाच वेळी फवारण्यात याव्यात. फवारणी पशुधनाच्या अंगावर केली तरी काहीही अपाय होत नाही.

ही फवारणी १५ दिवसांनी पुन्हा करण्यात यावी. या बुरशीची वाढ गोठ्यामध्ये सर्वत्र होऊन गोचीड जेव्हा अंडी घालण्यासाठी जमिनीवर येतात तेव्हा त्यांना या बुरशीची लागण होते व ते रोगग्रस्त होऊन नष्ट होतात. वळूमाता प्रक्षेत्रावर दि.२१ ऑगस्ट २०२० रोजी राबवण्यात आलेलेल्या या जैविक गोचीड नियंत्रण प्रयोगानंतर ९०% पर्यंत गोचीड निर्मुलन झाल्याचे दिसून आले आहे.

सौजन्य : डॉ.संजय काशिनाथ कुमकर, प्रक्षेत्र व्यवस्थापक, वळूमाता प्रक्षेत्र कोपरगाव, जि. नगर, मो. ९९६०९२२४०५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: