पुणे – जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात योजनांच्या लाभ आता घरबसल्या घेता येणार आहे. जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘महालाभार्थी’ या पोर्टलच्या माध्यमातून जिल्हातील शेतकरी एका क्लिकवर अर्ज दाखल करू शकणार आहेत. अशा पद्धतीचे पोर्टल विकसित करणारी पुणे ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

‘महालाभार्थी’ वेबपोर्टलचे मंगळवारी (ता.२९) खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आमदार संजय जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबुराव वायकर, महिला व बालविकास सभापती पूजा पारगे आणि सामाजिक न्याय सभापती सारिका पानसरे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा, या उद्देशाने पुणे विल्हा परिषद ही विविध कल्याणकारी योजना राबवीत असते.मात्र या योजनांची माहिती सर्वच पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे एक मोठे आव्हान असते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या माध्यमातून ‘महालाभार्थी’ हे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलमध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील योजनांसाठी एकच अर्ज असेल. लाभार्थी घरबसल्या माहिती भरुन आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करु शकणार आहेत.

आनलाईन अर्जातील माहितीचे प्रमाणीकरण ग्रामपंचायत पातळीवरच होणार आहे. यामध्ये भरलेली माहिती कायम जतन राहणार आहे. त्यामुळे भविष्यात आपण कोणत्या योजनेसाठी पात्र ठरतो, हेही तात्काळ कळू शकणार आहे. ऑनलाईन अर्ज करू न शकणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पुर्वीप्रमाणे अर्ज करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्जासाठी https://punezp.mkcl.org/zillaParishad/citizenRegistration/getRegistrationForm या पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.

शासकीय योजनांचे लाभार्थी निवडणे हे मोठे आव्हान असते. महालाभार्थीच्या मदतीने हे काम अत्यंत सोपे होणार आहे.संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे पोर्टल सुरु करण्याचा पहिला मान पुणे जिल्हा परिषदेला मिळाला आहे. इतर जिल्हा परिषदांसाठी हे पोर्टल अनुकरणीय ठरेल.

– निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *