Maharashtra state transport

१५ मार्गावर धावतेय बस; चार दिवसांत आणखी मार्ग वाढणार

पुणे : एसटीने तालुका ते जिल्हा आणि जिल्हा ते तालुका अशी प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. सध्यस्थितीत १५ मार्गावर एसटी धावत आहेत. यातील निम्या मार्गांवर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांना प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत आणखी काही मार्गावर बस सुरू करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

लॉकडाऊनमुळे सुमारे चार महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) प्रवासी वाहतूक बंद होती. पहिल्या टप्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात काही मार्गावर बस सुरू करण्यात आल्या होत्या. मागील आठवडाभरापासून स्वारगेट आणि वाकडेवाडी बस स्थानकातून बस सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या चार दिवसांत आणखी काही मार्गावर बस सुरू करण्याचा एसटी प्रशासनाचा विचार आहे.

ऑगस्ट पासून पुणे जिल्ह्यातील बारामती भोर, शिरूर, सासवड, नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापूर, जुन्नर, नीरा, आळेफाटा, भिमाशंकर, वेल्हा, दौंड, पाटस, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, पाबळ, घोडेगाव, अवसरी, भिगवण, मुळशी आदी मार्गावर बससेवा सुरू करण्याचे नियोजन एसटी प्रशासनाने जुलैमध्ये केले होते. त्यानुसार यातील बहुतांश मार्गावर आठवडाभरापूर्वीच बससेवा सुरू झाली आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार यातील काही मार्गावर बसच्या फेर्‍या वाढविण्यात येणार आहेत. तर आणखी काही मार्गावर बस सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. सध्यस्थितीत कोरोनामुळे केवळ २२ प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. तिकीट दरात कोणत्याच प्रकारची वाढ करण्यात आली नाही. मात्र प्रवासात मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आला असल्याचे एसटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

या मार्गावर प्रतिसाद

  • पुणे ते बारामती
  • पुणे ते आळेफाटा
  • पुणे ते इंदापूर
  • पुणे ते शिरूर
  • पुणे ते भिमाशंकर

पुणे ते आळेफाटा तासाला गाडी

ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यात पुणे ते आळेफाटा हा मार्ग आघाडीवर आहे. या मार्गावर बसच्या फेर्‍या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे पुणे ते आळेफाटा या मार्गावर प्रत्येक तासाला बस सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. सद्य:स्थितीत या मार्गावर बसच्या ठराविक फेर्‍या होत होत्या. मात्र या फेर्‍या अपुर्‍या ठरत असल्याने प्रत्येक तासाला बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *