पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या फुल बाजारात फुलांची आवक वाढली आहे. खरेदीसाठी विक्रेते आणि ग्राहकांची संख्या वाढली आहे. अचानक आवक वाढल्याने गुरूवारी फुलबाजार बहरला. गणेशोत्सवामुळे मंदिराची सजावट, विविध प्रकारचे हार, माळा आदींसाठी ग्राहकांकडून फुलांना मोठी मागणी असते.

कोरोनामुळे दीर्घकालावधीपासून फुलबाजार बंदच होता. मागील महिन्यांत फुल बाजार सुरू झाला आहे. मात्र शहरातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने फुलांची आवक होत नव्हती. तसेच ग्राहकांकडूनही अधिकची मागणी होत नव्हती. मात्र गणेशोत्सवामुळे विविध प्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे. खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

फुलबाजारात कर्नाटक, सातारा, सोलापूर, बीड भागातून बाजारात झेंडूच्या फुलांची आवक झाली. पुणे जिल्ह्यातून गुलाब, शेवंती, गुलछडी, अस्टर या फुलांची आवक झाली. कोरोनामुळे फुलांची आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. दरवर्षी गणेशोत्सवात फुलांची मोठी आवक होते. मात्र, फूल बाजाराचे कामकाज नियमित झाल्यानंतर पहिल्यांदाच काल फुलांची मोठी आवक झाली आहे.

झेंडूच्या फुलांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. प्रतवारीनुसार झेंडू, शेवंतीच्या फुलांना प्रतिकिलोला १०० ते २०० रुपये, गुलछडीला ३०० ते ४०० रुपये भाव मिळाला. अष्टरच्या चार गड्ड्यांना ५० रुपये तसेच गुलाबाच्या गड्डीला ३० ते ६० रुपये आणि डच गुलाबाच्या गड्डीला १०० ते १६० रुपये भाव मिळाला. गौरी विसर्जनापर्यंत फुलांचे भाव तेजीत राहणार असल्याचेही सागर भोसले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *