महिला सुरक्षा दक्षता समिती घेणार अडचणींची माहिती

पुणे : ग्रामीण भागातील दहावी-बारावीमध्ये उत्तीर्ण मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे आणि स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्यासाठी महिला सुरक्षा दक्षता समितीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनींच्या घरी जावून त्याचे पुढील शिक्षणाविषयी अडचणी, समस्या याची माहिती गोळा करावी, असे आवाहन जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुजा पारगे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील मुलींना दहावी-बारावी पास झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्याची खूप इच्छा असते. परंतू, आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे या मुलींना शिक्षण घेता येत नाही. बहुतांश मुली दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. काही मोजकेच पालक मुलींना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहीत करतात. मात्र, अन्य पालकांच्या “शिकून काय करणार’ या मानसिकतेने पुढील शिक्षणासाठी मुलींना पाठविले जात नाही. त्यामुळे गुणवंत असून त्यांना आपली इच्छा मारून घरातच थांबावे लागते. तर काही पालकांना आर्थिक अडचणीमुळे मुलींना पुढील शिक्षण देता येत नाही.

या पार्श्‍वभूमीवर मुलींनी शिकावे, महाविद्यालयीन शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे. यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून एक प्रगतीचे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलींच्या घरी जावून त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेण्याची जबाबदारी महिला सुरक्षा दक्षता समितीकडे सोपविण्यात आली आहे. त्यासाठी एक प्रश्‍नावली तयार करण्यात आली असून, या सर्वेक्षणामध्ये सर्व माहिती संकलीत केली जाणार आहे. त्यानंतर मुलींच्या आणि पालकांच्या असणाऱ्या अडचणी सोडवून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *