ऑनलाईन दर्शन सुविधा, कार्यक्रमांवर देणार भर

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख हेमंत रासने, माणिक चव्हाण, कुमार बांबुरे, राजाभाऊ सूर्यवंशी, प्रकाश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी मंदिरामध्येच उत्सवात गणपती विराजमान होणार आहे. दरवर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दगडूशेठ गणपती विराजमान होतो. मात्र, यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होत आहे. गणेशोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्यसेवा देण्यात येणार आहेत. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही, असे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले.

भाविकांची मोठी गर्दी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी होत असते. त्यामुळे मंदिरातच उत्सव साजरा करण्याचा ट्रस्टने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेऊन व समाजस्वाथ्याच्या विचार करुन ट्रस्टने दिलासादायक निर्णय घेतला आहे. हा आदर्श निर्णय असून, याचे अनुकरण देशभरात होईल

– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

दगडूशेठ गणपती ट्रस्टने मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय अभूतपूर्व व विवेकवृत्तीने घेतला आहे. या निर्णयामुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण हलका होणार आहे. दगडूशेठ गणपती उत्सवाप्रती भाविक व कार्यकर्त्यांच्या भावना मोडणे कठिण होते. पण, यंदा उत्सवात गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आचारसंहिता आखण्याची गरज आहे. त्याची सुरुवात दगडूशेठ गणपती ट्रस्टने केली हे अभिनंदनीय आहे.

– डॉ.रवींद्र शिसवे, पोलीस सहआयुक्त, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *