बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या सूचना

पुणे : विकासकामांना मंजुरी मिळूनही जिल्ह्यात अद्याप बहुतांश कामे सुरूच झाली नाहीत. ज्या ठेकेदारांनी अद्याप कामे सुरू केली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी सर्व विभागप्रमुख्यांना दिल्या.

जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झालेल्या स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षा आणि सभापती यांनी या सूचना दिल्या. यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव महादेव घुले, सदस्या आशा बुचके, दत्तात्रय झुरूंगे यासह अन्य सदस्य व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

निधी असूनही जिल्ह्यात विकासकामे वेळेत पूर्ण होत नाही. सर्व धडपड करून विकासकामांची निविदा काढली जाते. ठेकेदार कामही घेतो. मात्र, ते काम मार्गी लावण्यासाठी कधीच वेळेत कामांना सुरवात होत नाही. त्यामुळे मागील दोन वर्षातील अनेक विकासकामे अजूही कागदावरच आहेत. त्यात यंदा कोरोनामुळे निधीला कात्री लागली, अशा परिस्थितीत जिल्ह्यात विकासकामे कशी होणार, या मनमानी ठेकेदारांना चाप कधी बसणार असा संतप्त सवाल सदस्यांनी बैठकीत व्यक्त केला आहे.

त्यावर बांधकाम सभापती प्रमोद काकडे म्हणाले, ज्या ठेकेदारांनी १५ टक्के कमी दराने विकासकामे घेतली आणि प्रत्यक्षात अजून काम सुरू केले नाही त्या सर्व ठेकेदारांची यादी तयार करा. बांधकाम विभागासह अन्य विभागातील अधिकाऱ्यांच्याकडे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येकाची माहिती घेऊन ही यादी तयार करावी. दोषी ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सभापती काकडे यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *