पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांचे आवाहन

पुणे : शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले.

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात प्लाझ्मादाता गौरव कार्यक्रम पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते पार पडला. पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम म्हणाले, बोलणारे भरपूर बोलतात पण आपण सर्व प्लाझ्मादान करणाऱ्यांनी जे काही करुन दाखविले याचा मला आनंद आहे. पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो.

पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, प्लाझ्मा दान करण्याची तुमची ही कृती फार महत्त्वाची असून एखाद्याचा जीव वाचविणे हे एक मोठे काम आहे. तुमच्या मनात जागृत झालेली ही भावना अशीच पुढे चालू राहून समाजात एक मोठी चळवळ झाली पाहिजे. ही मोहीम शहराबरोबरच ग्रामीण भागातही राबवावी.

प्लाझ्मा दाते करण रणदिवे, मोहिम नलावडे, राहुल तुपे, वैभव लोढा, अजय मुनोत, राहुल लंगर,जमीर शेख, अवधुत दिवटे, वैभव भाकन, कुणाल तोडी, मोहित तोडी यांना पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

येथे करता येईल नोंद
कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या http://puneplasma.in या वेबसाईटवर किंवा सहायक पोलीस निरीक्षक शिंत्रे मो.नं.9960530329 या व्हॉटस्अपवर मेसेजव्दारे प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्यांनी नोंद करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *