कामगारांचे हित जोपासणार ; चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य

मुंबई : राज्यातील शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५० टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात असे सांगून, ते पुढे म्हणाले, जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळेल. शेतकऱ्यांच्या समोर सतत कर्जाचा डोंगर उभा आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे २९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १८ हजार ९८० कोटी रुपये रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून कर्जमुक्त करण्यात आले आहे. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे ४१८ लाख क्विंटल कापूस खरेदी यावर्षी शासनाने केलेली आहे. किसान हरितक्रांती करतात तर जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. त्याचबरोबरीने आपले कामगार सुद्धा उद्योगाची बाजू समर्थपणे सांभाळत असतात. म्हणून कामगारांच्या हिताकडेही शासन तितकेच लक्ष देईल. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महाजॉब्ज हे पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग येतील. कामगारांना रोजगार उपलब्ध होईल.

कोरोनाच्या कालावधीत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आपले काम चोखपणे बजावले. पण हे करताना काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कोरोनाला बळी पडले. त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अहोरात्र आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज असणाऱ्या आपल्या जवानांच्या कामगिरीचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना त्यांनी अभिवादन केले. राज्यातील राष्ट्रपती पदक, शौर्यपदक आणि प्रशंसनीय सेवा पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. दरम्यान मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांनी कोविड योध्दांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *