पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

पुणे : तब्बल पाच महिन्यांनंतर लालपरी प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली. पहिल्याच दिवशी एसटीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्यातून सुटलेल्या ठाणे, दादर, बोरिवली, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, नाशिक या मार्गावर बसेस धावल्या. सायंकाळपर्यंत शहरातून बसच्या ७२ फेर्‍या झाल्या होत्या. परिवर्तनसह, शिवशाही आणि शिवनेरीलाही प्रतिसाद मिळाल्याचे एसटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात टाळेबंदीची करण्यात आली. २५ मार्चपासून शहरातून धावणार्‍या बहुतांश मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर राज्यात तसेच राज्याबाहेर अडकलेल्या नागरिकांना निश्चित स्थळी पोहचविण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या सुचनेनुसार काही मार्गावर बस धावत होत्या. पुण्यासह राज्यभरातच एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने एसटीला कोट्यावधीचा आर्थिक फटका सहन करावा लागला.

टाळेबंदी काही प्रमाणात शिथील केल्यानंतर जिल्हातंर्गत एसटीची प्रवासी वाहतूक सुरू झाली. मात्र नंतरच्या टप्यात ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण वाढल्याने तालुक्याहून सुरू असलेली प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. गुरूवारपासून शासनाने एसटीची आंतरजिल्हा सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. सेवा सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शिवशाही, शिवनेरीही रस्त्यावर
पुण्याहून बोरीवली, ठाणे, दादर भागात शिवनेरी तर, नाशिक, औरंगाबादला शिवशाही गाड्या सोडण्यात आल्या. पहिल्याच दिवशी लालपरीसह इतर गाड्या देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. सध्या ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे वाहतूक विभाग नियंत्रक ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *