सूनील केदार ; प्रमाणित नसलेल्या दुधात नीळ टाकण्याचे आदेश

मुंबई : राज्यातील दुधात होणारी भेसळ विरोधात दुग्ध व्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कारवाई करणार आहे. भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करुन प्रमाणित नसलेल्या दुधात नीळ टाकण्याचे आदेश पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिले.

दूध भेसळ रोखण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्याकरता बैठक घेण्यात आली. या बैठकीला दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त सुमंत भांगे अन्न व औषध विभागाचे आयुक्त अरुण उन्हाळे दुग्ध व्यवसाय विभागाचे उपायुक्त एस.आर. शिपूरकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सुनील केदार  म्हणाले, दुधातील होणारी भेसळ रोखण्याकरीता दुधाचे नमुने तपासण्याकरीता मी मराठवाडा विभागात जाणार आहे.  राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे पश्चिम महाराष्ट्रात दुधाचे नमुने तपासण्याकरीता जाणार आहे. तसेच मुंबईसह ठाणे या भागात दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त हे दुधाचे नमुने तपासून दोंषीवर कारवाई करणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पिशवी बंद दुधाची मागणीत घट झाली असून, हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्टांन्न निर्मीती केंद्र बंद झाली आहे. परिणामी राज्यातील दुधाच्या मागणीतही घट झाल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता. तो शासनाने दूध भुकटीच्या स्वरुपात सोडवला. यापुढेही दुधाची मागणी आणि पुरवठा याचा समतोल राखण्याकरीता दुग्ध व्यवसाय विभागाने दक्ष्‍ा राहावे. राज्यात भेसळयुक्त दूध ग्राहकांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होतो.

दूध भेसळ रोखल्यास शेतकऱ्यांच्या दूध विक्री हा जोड धंदा किफायतशीर ठरणार असून, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. संबधित अधिकाऱ्यांनी दुध भेसळ हा विषय गांभीर्याने हाताळावा. दुग्ध व्यवसाय विभाग आणि अन्न औषध प्रशासन या विभागाद्वारे दुध भेसळ रोखण्याकरीता शासनाकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल व्हॅन अद्ययावत करावे. त्यासाठी लागणारे रसायन तत्काळ उपलब्ध करावे. तत्रंज्ञ व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचनाही केदार यांनी यावेळी दिल्या.

भेसळ करणाऱ्यांवर कठोर करा : भरणे
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले, दुध भेसळ करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीसांची मदत घेण्यात यावी. भविष्यात दूध भेसळ करण्याचे धाडस करणार नाही, अशी कठोर कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी, अशा सूचना भरणे यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *