जिल्हा परिषदेच्या स्मार्ट ग्राम पुरस्काराची घोषणा

पुणे : जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या स्मार्ट ग्राम पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०१८-१९ च्या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी इंदापूर तालुक्‍यातील सपकळवाडी, २०१९-२० च्या पुरस्कारासाठी मावळमधील भोयरे आणि २०२०-२१ च्या पुरस्कारासाठी जुन्नर मधील ठिकेकरवाडी या गावांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी दिली.

सन २०१८-१९ मधील स्मार्ट ग्राम पुरस्कारामध्ये आंबेगाव तालुक्‍यातील भराडी ग्रामपंचायत, खेड तालुक्‍यातील वेताळे, भोर तालुक्‍यातील रायरी, बारामती तालुक्‍यातील गुणवडी यासह अन्य नऊ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये प्रत्येकी १३ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे.

यावर्षी या पुरस्काराचे नाव बदलून आर.आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना असे देण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतींना ५० लाख रुपये तर तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतींना १० लाख रुपये देण्यात येणार आहेत.

या पुरस्कारातून मिळालेली रक्कमेतून अपारंपारिक ऊर्जा संबंधित अभिनव प्रकल्प, स्वच्छतेबाबत प्रकल्प, महिला सक्षमीकरण, स्वच्छ पाणी वितरण, सौर पथदिवे बसविणे, अतिक्रमण रोखण्यासाठी कुंपन घालणे तसेच नागरिकांच्या सोईसाठी इंटरनेट वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे. करोनाचा संसर्ग वाढल्याने मागील वर्षांचे फेर तपासणीचे काम शिल्लक राहिले होते. त्यामुळे यावर्षी तीनही वर्षांचे पुरस्कार जाहीर केले असल्याचे पंचायत विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *