स्पाईस हेल्थच्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण

मुंबई : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात कोरोना चाचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात फिरत्या प्रयोग शाळा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुंबई शहरासाठी स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, स्पाईस जेटचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, स्पाईस हेल्थचे जुबेर खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेंव्हा पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणीच कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होत्या. शासनाने काही दिवसांमध्ये ही संख्या ५०० वर नेली. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातून कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशियातांची तपासणी करतांना सहव्याधीग्रस्तांचा शोधही घेण्यात आला.

कोरोनावर आता लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशात कोरोनाचे नवे स्ट्रेन येतांना दिसत आहेत. त्यावर संशोधनही सुरु असून, कोविड रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याला शासनाचे प्राधान्य आहे. मुंबईत या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा शोध घेण्याचा मोठा ड्राईव्ह हातात घेता येईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी येथील कोविड केंद्रात या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे. या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त ३ हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल २४ तासात मिळेल. फक्त ४९९ रुपयांमध्ये कोरोना चाचणी करणे शक्य होईल, अशी माहिती आयुक्त आय.एस. चहल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *