पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर त्याबाबतचे संदेश पाठविण्यात आले आहेत. निवड झाल्याचा संदेश मिळालेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. कृषि विभागाने पोर्टल वर अर्ज कलेल्या शेतकऱ्यांच्या निवडीसाठी लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये प्राधान्याने कृषि यांत्रिकीकरण, अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीसाठी नवीन विहीर, कांदाचाळ, प्लॅस्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन इत्यादी योजनांचा समावेश आहे.

कागदपत्रांच्या छाननीनंतर पुढे करावयाच्या कार्यवाहीबाबत लाभार्थिंना वेळोवेळी सूचना प्राप्त होतील. सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता. तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.

अशी करा कागदपत्रे अपलोड

  • https://mahadbtmahait.gov.in/ या महाडीबीटी संकेतस्थळावर जावे.
  • या संकेतस्थळावर “शेतकरी योजना” या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर “वापरकर्ता आयडी” या पर्यायावर क्लिक करावे.
  • “वापरकर्ता आयडी व पासवर्ड” व त्याखाली प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरून “लॉग इन करा” यावर क्लिक करा.
  • प्रोफाइल स्थिती पृष्ठावर मुख्य मेनू मधील “मी अर्ज केलेल्या बाबी” या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर अप्लाइड घटक मध्ये“छाननी अंतर्गत अर्ज” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण केलेल्या सर्व अर्जाची स्थिती दिसेल.
  • स्थितीमध्ये “Upload Document Under Scrutiny” अशा शेरा ज्या घटकासमोर असेल त्या घटकासाठी लॉटरीद्वारे आपली निवड झाली आहे, असे समजावे.
  • अप्लाइड घटक याच पृष्ठावरील मुख्य मेनूमधील “कागदपत्रे अपलोड करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर “वैयक्तिक कागदपत्रे” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दर्शविलेल्या स्क्रीन वरील “कागदपत्र अपलोड करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • कागदपत्र अपलोड स्क्रीन दिसेल.त्यात नमूद केलेली विहित कागदपत्रे १५ केबी ते ५०० केबी या आकारमानातच अपलोड करावीत.
  • त्यानंतर “जतन करा” या पर्यायावर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *