विदर्भात मंगळवारी पावसाचा अंदाज

पुणे : राज्याच्या किमान तापमानात दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. यातच पोषक हवामान होत असल्याने पुढील आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मंगळवारी (ता.१६) विदर्भात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, केरळपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. यातच बंगालच्या उपसागरावरू वाहणाऱ्या वाऱ्यांबरोबरच बाष्पाचा पुरवठा होऊ लागल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवार (ता.१६) ते शुक्रवार (ता. १९) राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सौजन्य : भारतीय हवामान विभाग

दरम्यान, तापमानाचा पारा घसरल्याने गेले काही दिवस राज्यात हुडहुडी वाढली होती. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारताताच्या किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाच्या चटक्यासह उकाडाही वाढल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवारी (ता. १२) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ७.२ अंश, तर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुणे (११.९ अंश) वगळता राज्यात उर्वरीत सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे गेला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शुक्रवारी (ता. १२) नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.९, जळगाव १३.६, कोल्हापूर १७.२, महाबळेश्वर १५.०, मालेगाव १३.८, नाशिक १२.०, सांगली १७.०, सातारा १३.५, सोलापूर १८.५, मुंबई (कुलाबा) २०.०, सांताक्रूझ १८.४, डहाणू १८.५, रत्नागिरी १७.५, ठाणे २१, वेंगुर्ला १५.९, औरंगाबाद १४.३, बीड १७.२, नांदेड १४.०, उस्मानाबाद १६.४, परभणी १२.४, अकोला १५.०, अमरावती १३.३, बुलढाणा १६.८, ब्रह्मपूरी १३.९, चंद्रपूर १५.४, गोंदिया १३.०, नागपूर १४.२, वाशिम १६.०, वर्धा १५.५, यवतमाळ १५.५.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *