विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजा, गारपीटीसह पावसाचा अंदाज

पुणे : बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाला पोषक हवामान होत आहे. विदर्भसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गुरूवारपर्यंत (ता. १८) मेघगर्जना, विजांसह, गारपीट होण्यात इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. खंडीत झालेले वाऱ्यांचे प्रवाह, बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांबरोबरच होणारा बाष्पाचा पुरवठा, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह या पोषक स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

मंगळवार (ता.१६) ते शुक्रवार (ता. १९) राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह शक्यता आहे. विदर्भसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गुरूवारपर्यंत (ता. १८) मेघगर्जना, विजांसह, गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या चटक्यासह उकाडाही वाढल्याचे दिसून येत आहे.

पावसाला पोषक वातावरणामुळे महाराष्ट्रासह मध्य भारताच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. सोमवारी (ता. १५) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.२ अंश, तर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात १३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उर्वरीत सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे गेला आहे.

सौजन्य : हवामान विभाग

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोमवारी (ता. १५) नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १४.६, जळगाव १४.०, कोल्हापूर १८.५, महाबळेश्वर १५.८, मालेगाव १८.०, नाशिक १५.८, सांगली १७.४, सातारा १५.४, सोलापूर १९.१, मुंबई (कुलाबा) २१.१, सांताक्रूझ २०.२, डहाणू १९.३, रत्नागिरी १९.६, ठाणे २०.०, वेंगुर्ला १७.७, औरंगाबाद १६.६, बीड १९.७, नांदेड १९.०, उस्मानाबाद १६.०, परभणी १६.२, अकोला १७.२, अमरावती १८.४, बुलढाणा १८.६, ब्रह्मपूरी १७.८, चंद्रपूर १७.२, गोंदिया १२.४, नागपूर १८.०, वाशिम १६.२, वर्धा १८.५, यवतमाळ १८.०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *