मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

पुणे : किमान तापमानात वाढ झाल्यानंतर राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवारपासून (ता. १६) राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुधवार (ता.१७) आणि गुरूवार (ता. १८) गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून केरळच्या किनाऱ्यापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांबरोबरच बाष्पाचा पुरवठा होत असून उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह देखील येत आहे.

ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवार (ता.१६) ते शुक्रवार (ता. १९) राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह शक्यता आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आली आहे.

पावसाला पोषक वातावरणामुळे महाराष्ट्रासह मध्य भारताच्या किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाच्या चटक्यासह उकाडाही वाढल्याचे दिसून येत आहे. रविवारी (ता. १४) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९ अंश, तर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उर्वरीत सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा १३ अंशांच्या पुढे गेला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रविवारी (ता. १४) नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १३.२, जळगाव १६.०, कोल्हापूर १७.९, महाबळेश्वर १५.४, मालेगाव १८.४, नाशिक १५.४, सांगली १६.९, सातारा १५.०, सोलापूर १७.०, मुंबई (कुलाबा) २०.५, सांताक्रूझ १९.४, अलिबाग १५.९, डहाणू १८.५, रत्नागिरी १९.०, ठाणे २०.०, वेंगुर्ला १६.३, औरंगाबाद १७.०, बीड १९.७, उस्मानाबाद १५.२, परभणी १६.०, अकोला १८.१, अमरावती १६.३, बुलढाणा १८.२, ब्रह्मपूरी १६.६, चंद्रपूर १७.६, गोंदिया १५.३, नागपूर १७.८, वाशिम १६.६, वर्धा १८.५, यवतमाळ १६.०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!