महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची माहिती

पुणे : कृषी धोरणाअंतर्गत कृषी पंपधारक ग्राहकांना वीजबिलांतून थकबाकीमुक्तीची संधी उपलब्ध झाली आहे. वसुल झालेल्या एकूण रकमेतील ६६ टक्के रक्कम ही संबंधीत ग्रामपंचायत व जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेच्या पायाभूत सक्षमीकरणासाठी व विस्तारीकरणासाठी वापरली जाणार आहे, अशी माहिती महावितरणचे पुणे ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली.

राजुरी (ता. जुन्नर) येथे गुरुवारी (ता. १८) अखिल भारतीय ग्राहक पंचायत व महावितरणच्या वतीने कृषीपंपधारक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात कृषी धोरण २०२० ची सविस्तर माहिती देताना अधीक्षक अभियंता पवार बोलत होते. यावेळी ग्राहक पंचायतीचे संघटन मंत्री बाळासाहेब औटी, पंचायत समितीचे माजी सभापती दीपक आवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य शासनाच्या कृषी धोरणानुसार कृषीपंपधारक शेतकऱ्यांसह लघु व उच्चदाब कृषी ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये येत्या वर्षभरात योजनेप्रमाणे सुधारित मूळ थकबाकीची ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित सर्व थकबाकी माफ होणार आहे. यासोबतच कृषी ग्राहकांनी वीजबिलांपोटी भरलेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत व ३३ टक्के रक्कम जिल्हा क्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. यातून नवीन उपकेंद्रासह वीज यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

ग्रामपंचायत, महिला बचत गट, साखर कारखाने, शेतकरी सहकारी संस्था यांनी वीज बिल भरणा केंद्रांच्या माध्यमातून योग्य मोबदला दिला जाणार आहे. कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसह गावातील व जिल्ह्यातील पायाभूत वीज यंत्रणेच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन अधीक्षक अभियंता पवार यांनी केले. यावेळी बाळासाहेब औटी यांनी कृषीग्राहकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात परिसरातील ५ कृषी ग्राहकांनी प्रातिनिधीक स्वरूपात १ लाख ९३ हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला. त्यांच्यासह वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी प्रयत्न करणारे जनमित्र अमित बनकर यांचा गौरव करण्यात आला. बनकर यांच्या प्रयत्नातून ४४ ग्राहकांनी १४ लाख ५७ हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. कार्यक्रमाला मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता एच. ए. नारखेडे, राजुरीच्या सरपंच प्रिया हाडवळे, उंचखडकच्या सरपंच सुवर्णा कणसे, बोरीच्या सरपंच वैशाली जाधव, उपकार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे, सिद्धार्थ सोनोने आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *