हमालीच्या दरात २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव

पुणे : कोरोना टाळेबंदीनंतर काही प्रमाणात शेतकरी सावरत असतानाच शेतमालाचे भाव कोसळले. हमी भाव मिळणे तर सोडाच, पण घाम गाळून पिकविलेला शेतमाल मातीमोल भावाने विकण्याची वेळ आली. हमाली, तोलाईसह छुप्या पद्धतीने वसूल केल्या जाणाऱ्या आडत व वाराईच्या ओझ्याखाली दाबल्या गेलेल्या शेतकऱ्यांवर आता हमाली दरवाढीचा अधिभारही वाढणार आहे.

गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डामध्ये गाळा कामगार तसेच टोळी कामगारांना प्रत्येकी वीस टक्के प्रमाणे हमाली दरवाढीस मान्यता देण्यात आली आहे. या दरवाढीवर ३५ टक्के लेव्ही कायम राहिल, असा निर्णय बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. मान्यता मिळाल्यानंतर बाजार समितीच्या वतीने नवीन दरपत्रक जारी करण्यात येणार आहे.

बैठकीला बाजार समितीचे सतीश कोंडे, शेतकरी संघटनेचे माऊली तुपे, कामगार युनियनचे अध्यक्ष किसन काळे, सचिव संतोष नांगरे, खजिनदार विजय चोरगे, माजी अध्यक्ष संजय साष्टे, अनंत कुडले, भरत शेळके तसेच श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, राजेंद्र कोरपे, माथाडी हमाल मंडळाचे सचिव सुरेश साळुंके, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरगे, राजेश मोहोळ, जनरल माथाडी कामगार युनियनचे संपत धोंडे, भारतीय कामगार सेनेचे दादा तुपे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

सर्व खर्च शेतकऱ्यांच्या माथी

शेतीमालाचे दर कोसळल्यानंतर जून्या दराने आकारणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती दमडा ही न पडल्याने मोटार भाडे अंगावर आल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता नवीन हमाली दर लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पट्टीतून कपात वाढणार आहे. हमाली, तोलाई शेतकऱ्याच्या पट्टीतून कायदेशीर वसूल केली जाते. वाराईची रक्कम माल वाहतूकदार देत असला, तरी ते पैसे तो शेतकऱ्यांकडूनच वसूल करतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आडत खरेदीदाराकडून घेणे बंधनकारक आहे. मात्र आडतीची ही रक्कम हिशोबात धरून व्यापाऱ्याकडून शेत मालाचे दर ठरविले जातात. यामुळे मालाला कमी भाव मिळून, अप्रत्यक्षपणे आडतीचा भुर्दंडही शेतकऱ्यावरच पडत आहे.

दुसरीकडे कच्च्या पावत्यांच्या सहाय्याने शेतकरी आणि व्यापारी दोन्ही बाजूने आडत गोळा केल्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास २० टक्के वाढलेल्या हमाली दराच्या रकमेवर ३५ टक्के आडत द्यावी लागणार असल्याने कलिंगड, खरबूज सारख्या काही फळ पिकांना आडतीपेक्षा हमाली जास्त होणार आहे. अशावेळी या पिकांचे दर कोसळ्यास शेतकऱ्यांना माल देऊनही, अधिकचे पैसे द्यावे लागतील.

हमाली आकारणीसह पॅकेजिंग बदलण्याची गरज

गेल्या काही वर्षांत मालाच्या डागांचे पॅकेजिंग बदलले आहे. खोकी, करंडी आदी प्रकार कालबाह्य होऊन प्लास्टीक पिशव्या आणि क्रेटच्या सहाय्याने मालाची ने आण केली जात आहे. डागांनुसार भाडे आकारण्यामुळे जास्त वजनाच्या डांगांना, कमी तर कमी वजनाच्या डागांना जास्त भाडे आकारावे लागते. यात शेतकऱ्यांसह कष्टकरी कामगारांचे शोषण होत आहे. छोट्या डांगांचे भाडे कसे आकारायचे, यावरून आडत्यांचीही पंचायत होत आहे. त्यामुळे मालाचे पॅकेजिंग, वजन, आणि त्यानुसार हमाली आकारणीचे दर बदलण्याची आवश्यकता आहे.

शेतकरी संघटना मुग गिळून गप्प

शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे भासविणाऱ्या शेतकरी संघटना मात्र, स्वतःच्या फायद्यासाठी मुग गिळून गप्प आहेत. राजकीय पोळी भाजण्यासाठी अग्रेसर असलेल्या शेतकरी नेत्यांनी दरवाढीच्या या बैठकीकडे पाठ फिरविली. खरं तर या बैठकांना माल घेऊन येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आमंत्रित करण्याची आवश्यकता आहे. कारण या दरवाढीचा झळ त्यांनाच सर्वाधिक बसणार आहे. तरीही शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी बैठकीला येणार का हा देखील प्रश्नच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *