किमान तापमानाचा पारा आणखी घसरला

पुणे : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्यानंतर महाराष्ट्रातही गारठा वाढला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा घसरला. मंगळवारी (ता.२२) तेथे राज्याच्या यंदाच्या हंगामातील निचांकी ५.१ अंश, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्येही थंडीची लाट कायम आहे.

हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टी होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतातील थंडीची तीव्र लाट आल्याने मध्य प्रदेशातील पंचमढी येथे मंगळवारी (ता. २२) देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थानमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने काही ठिकाणी थंड दिवस अनुभवाला येत आहेत.

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातही कडाका वाढू लागला आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठापाठोपाठ परभणी शहरात ७.६ अंश, यवतमाळ येथे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, नगर, जळगाव, नाशिक, सातारा, औरंगाबाद येथे तापमानाचा पारा १० अंशापेक्षा खाली घसरला आहे. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे.

मंगळवारी (ता. २२) सकाळपर्यंत राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ८.१ (-३), नगर ८.१, जळगाव ९.० (-३), कोल्हापूर १४.५ (-१), महाबळेश्वर ११.३ (-२), मालेगाव १०.२ (-१), नाशिक ८.४ (-२), सांगली १२.६ (-२), सातारा ९.० (-४), सोलापूर १२.१ (-३), सांताक्रूज १६.० (-२), अलिबाग १६.५ (-२), डहाणू १६.६ (-२), रत्नागिरी १८.३ (-२), औरंगाबाद ९.२ (-२), बीड १०.३ (-३), नांदेड १० (-३), उस्मानाबाद ११.४ (-२), परभणी ७.६ (-६), अकोला ९.६ (-४), अमरावती १२.५ (-२), बुलडाणा ११.० (-३), चंद्रपूर ९.६ (-४), गोंदिया ७.८ (-४), नागपूर ८.६ (-४), वर्धा १०.३ (-३), यवतमाळ ८.५ (-६).

विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता

उत्तर भारतातील थंडीने महाराष्ट्रातही हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत असून, काही भागात तापमानात १ ते ३ अशांची घट होण्याची शक्यता आहे. गुरूवारी (ता. २४) विदर्भात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. तर पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातही थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *