राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान

पुणे : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी शुक्रवारपासून (ता. ११) आचार संहिता लागू झाली आहे. कोरोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकराज आता संपुष्टात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.

आयोगातर्फे १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन करून निवडणुका वेळापत्रकानुसार विहित मुदतीत पार पाडण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम

  • तहसीलदार कार्यालयाने निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर २०२०
  • उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत : २३ ते ३० डिसेंबर २०२० (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
  • उमेदवारी अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२०
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ जानेवारी २०२१
  • मतदान : १५ जानेवारी २०२१ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)
  • मतमोजणी : १८ जानेवारी २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!