परभणीत हंगामातील निचांक ; यवतमाळ, गोंदियातही थंडीची लाट

पुणे : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने विदर्भापाठोपाठ मराठवाड्यालाही हुडहुडी भरली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात राज्यातील यंदाच्या हंगामातील निचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळ, गोंदिया येथेही थंडीची लाट आली आहे.

हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टी होत असून, उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आली आहे. पंजाबच्या अमृतसर येथे रविवारी (ता. २०) देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात कमी १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तरप्रदेश, उत्तर राजस्थानमध्ये तीव्र लाट होती. तर पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहारसह विदर्भातही थंडीची लाट होती. बिहार, उत्तर प्रदेशात थंड दिवस अनुभवाला आला.

उत्तरेकडील थंडगार हवा महाराष्ट्राच्या दिशेने येऊ लागल्याने राज्यात कडाका वाढू लागला आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठापाठोपाठ परभणी शहरात ८.१ अंश, यवतमाळ, गोंदिया येथे ७ अंश सेल्सिअस, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद, अकोला, नागपूर, वर्धा, पुणे, नाशिक येथे तापमान १० अंशापेक्षा खाली घसरले. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ८ अंशांची घट झाल्याने यवतमाळ येथे थंडीची तीव्र लाट, तर ४.५ अंशापेक्षा अधिक घट झाल्याने परभणी, गोंदिया येथे थंडीची लाट आली आहे.

सोमवारी (ता. २१) सकाळपर्यंत राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ९.२ (-२), जळगाव १०.५ (-१), कोल्हापूर १५.७ (१), महाबळेश्वर ११.५ (-२), मालेगाव १०.८ (०), नाशिक ९.१ (-१), सातारा १२.१ (०), सांगली १४.६ (१), सोलापूर १३.४ (-२), सांताक्रूज १८ (०), अलिबाग १७.१ (-१), डहाणू १९.२ (१), रत्नागिरी १९.७ (०), औरंगाबाद ९.५ (-२), परभणी ८.१ (-५), उस्मानाबाद १३.५ (०), नांदेड ११ (-१), अकोला ९.६ (-४), अमरावती ११.१ (-४), बुलडाणा ११.४ (-३), चंद्रपूर १० (-३), गोंदिया ७ (-५), नागपूर ८.४ (-४), वर्धा ९.८ (-३), यवतमाळ ७ (-८).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *