शासनाकडे लवकरच प्रस्ताव सादर करणार

पुणे : जिल्ह्यात ऊस पिकानंतर दुसऱ्या क्रमांकावरील बागायती शेती ही भाजीपाला आणि फळ पिकांची केली जाते. या पिकांसाठी मार्गदर्शन करणारी यंत्रणा किंवा विभाग जिल्हा परिषदांमध्ये अस्तित्वात नसल्याने पुणे जिल्हा परिषदेमध्ये हॉर्टीकल्चर विभाग नव्याने सुरू करण्याच्या प्रस्ताव शासनाला दिला जाणार आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये फळबागा पिकाखालील क्षेत्र सुमारे ७० ते ८० लाख हेक्टरपर्यंत आहे याशिवाय ७० लाख हेक्टर क्षेत्रांमध्ये भाजीपाल्याची पिके घेतली जातात. जिल्हा परिषदेकडील योजना आणि विभाग हे शेती पिकाखालील तृणधान्य, गळीताचे पिके, कडधान्य तसेच शेतीविषयक पिके आणि शेती उपयोगी साहित्य यंत्रसामुग्री पुरवठा या योजनांवर सध्या कार्यरत आहे. फळपिके भाजीपाला आणि फुलशेती बद्दलच्या योजनांचा तसेच विभागाचा अंतर्भाव जिल्हा परिषदेमध्ये पूर्णपणे नसल्याने पुणे जिल्हा परिषदेचे हार्टीकल्चर विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

शेती पिके आणि उत्पादनाचा विचार करता पुणे जिल्ह्यामध्ये डाळिंब ,द्राक्ष, आंबा, पेरू, केळी, चिकू ,सिताफळ, अंजीर ,जांभूळ, बोर, या फळपिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते तसेच टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी, शेवगा, बटाटे ,कांदा आधी फळ आणि वेलवर्गीय भाग भाज्यांचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात आहे. भाजीपाल्याचे उत्पादन बारमाही आहे. शेती क्षेत्रामध्ये होत असलेले बदल आणि आधुनिकीकरण या संदर्भातील योजनांचा अंतर्भाव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे नसल्याने स्वतंत्रपणे हॉर्टिकल्चर विभाग सुरू केल्यास ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील योजनांचा लाभ होऊ शकेल तसेच मार्गदर्शन देखील करता येईल हा प्रमुख उद्देश असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

सामाजिक वनीकरण विभाग जिल्हा परिषदेला जोडावा

ग्रामपंचायतींच्या माध्यमातून एमआरईजीएस योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांसाठी ६०: ४० गुणोत्तरमध्ये कामाचे दिवस ठरलेले आहेत. म्हणून सामाजिक वनीकरण विभाग हा जिल्हा परिषदेला जोडल्यास ग्रामपंचायत क्षेत्रातून वनीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. कृषी विभागाशी सामाजिक वनीकरण विभाग संलग्न ठेवता येईल. यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला जात असून, परिपूर्ण प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे.

पुणे जिल्हा शेतीच्या आधुनिकीकरणामुळे राज्यात अग्रेसर आहे. फळ आणि भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन जिल्ह्यात होते त्यामुळे स्वतंत्र हार्टीकल्चर विभाग जिल्हा परिषदेमध्ये सुरू केल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तसेच अनेक तरुण शेती क्षेत्रात नव्याने येत आहेत त्यांना देखील मार्गदर्शन मिळेल.
– बाबुराव वायकर, सभापती, कृषी आणि पशुसंवर्धन विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *