पुणे : जिल्ह्यातील चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची पुढील पाच वर्षांसाठीची आरक्षण सोडत ८ डिसेंबर रोजी काढली जाणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालयामार्फत या आरक्षण सोडतीचे नियोजन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी (ता.२४) आरक्षण सोडतीत घोषणा केली.

पुणे जिल्ह्यामध्ये १४०८ ग्रामपंचायती असून, त्यातील चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली जाईल. आठ ग्रामपंचायती नव्याने स्थापन झालेल्या आहेत. नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीसंदर्भात शासनाकडून अद्याप आरक्षणाबद्दलचे कोणतेही आदेश नसल्याने या आठ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढली जाणार नाही.

आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण गटासाठी ७५६ ग्रामपंचायती सरपंचपदे उपलब्ध आहेत. त्यातील ३८३ सरपंचपदे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी, तर ३७३ सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३४७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित आहेत. त्यातील १७७ महिलांसाठी, तर १७० नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी ५८ सरपंचपद आरक्षित आहेत, त्यातील ३० महिलांसाठी आरक्षित असतील.

अनुसूचित जातीसाठी १२५ सरपंच पदांपैकी ६६ पदे महिलांसाठी आरक्षित आहे. अनुसूचित क्षेत्रांमधील ११४ ग्रामपंचायती असून, त्यामधील ५८ सरपंच पदे ही महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाच्या वतीने आरक्षण सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, तालुकास्तरावर आठ डिसेंबरला सरपंचपदाच्या आरक्षित आरक्षण सोडती काढल्या जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *